भुमरे, जलील प्रचारासाठी थेट न्यायालयात! सरन्यायाधीश, विधि सचिवांकडे तक्रार
छत्रपती संभाजीनगरातील मिंधे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे आणि मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीनचे उमेदवार इम्तियाज जलील हे प्रचारासाठी थेट न्यायालयात पोचल्याने खळबळ उडाली. उमेदवारांनी वकिलांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. भुमरे, जलील यांच्या थेट न्यायालयातील प्रचाराला आक्षेप घेण्यात आला असून, यासंदर्भात सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, विधि आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला आता वेग आला आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला आहे. आचारसंहिता लागू असल्याने न्यायालये, सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये उमेदवारांना थेट प्रचार करता येत नाही. मात्र, हा संकेत झुगारून दोन दिवसांपूर्वी मिंधे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे हे थेट उच्च न्यायालय तसेच जिल्हा न्यायालयात पोहोचले. तेथे त्यांनी वकिलांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे हेदेखील होते. उच्च न्यायालयाच्या ग्रंथालयासही त्यांनी भेट दिली. वकील संघाच्या पदाधिकार्यांनी भुमरे यांचे स्वागतही केले. संदिपान भुमरे यांच्यानंतर मजलिसचे उमेदवार इम्तियाज जलील यांनीही जिल्हा न्यायालयात जाऊन वकिलांच्या भेटीगाठी घेतल्या. जिल्हा वकील संघाच्या पदाधिकार्यांनाही ते भेटले.
न्यायालयाच्या आवारात येऊन उमेदवारांनी प्रचार करण्यास खंडपीठ वकील संघाचे माजी सदस्य शोमितकुमार साळुंके यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, विधि आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. बॉम्बे हायकोर्ट अॅक्ट सेक्शन 11 नुसार न्यायालयीन परिसर हा विशेषाधिकार असलेली जागा आहे. आचारसंहितेच्या काळात अशा जागेत येण्यासाठी परवानगी अनिवार्य आहे. इतरही प्रसंगी या परिसरात छायाचित्र काढणे, बाईट देण्यासाठीही न्यायालयाच्या रजिस्ट्रारची परवानगी घ्यावी लागते. भुमरे, जलील यांनी अशी कोणती परवानगी घेतली होती का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List