भूजलपातळी घटल्याने खटावमध्ये तीक्र पाणीटंचाई
>>नितीन राऊत
दुष्काळी खटाव तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील नेर सोडून तालुक्यातील पूर्व भागातील येरळवाडीसह सर्वच तलाव, धरणे आणि बहुतांश विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. प्रशासनाकडून 30 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 11 गावांना विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवले जात आहे. पशुधनाच्या चाऱयासाठी शेतकऱयांना धावाधाव करावी लागत असून, पशुपालक मेटाकुटीला आला आहे. आगामी दोन महिन्यांत टंचाई आणखी तीव्र होणार असून, दुष्काळाची दाहकता रौद्ररूप धारण करणार आहे. यापुढील दोन महिन्यांच्या काळात प्रशासनाला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
खटाव तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. तालुक्याच्या दक्षिण आणि उत्तर भागात डिसेंबर महिन्यापासूनच टंचाई जाणवू लागली होती. ‘जिहे-कठापूर योजने’चे पाणी नेर धरणात आणि उरमोडीचे पाणी लाभक्षेत्रात सोडल्याने काही भागात टंचाई थोडी सुसह्य झाली होती. मात्र, आता पुन्हा टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. ज्या भागात कोणत्याच योजनेचे पाणी जात नाही, त्या भागात दुष्काळाने दाहक स्वरूप धारण केले आहे.
तालुक्यातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. येरळा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. तर येरळवाडी धरणातील पाणीसाठा कमी झाला असून, त्यावर आधारित पूर्व भागातील बहुतांशी नळपाणीपुरवठांना घरघर लागली आहे. त्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
नेर, मायणी तलावांत किरकोळ पाणीसाठा
खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नेर धरणात ‘जिहे कठापूर योजने’चे पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे सध्या धरणात 3 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मायणी तलावात 0.13 दशलक्ष घनमीटर म्हणजेच फक्त 9 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिरसवडी तलावात 5 टक्के पाणी आहे. हे पाणी कडक उन्हाळ्यातील बाष्पीभवनामुळे टिकण्याची शक्यता फार कमी आहे.
पशुधनाच्या चाऱयासाठी धावाधाव
तालुक्यातील ज्या भागात उरमोडी, जिहे कठापूरचे पाणी पोहचले होते, त्या भागात थोडाफार चारा उपलब्ध झाला आहे. मात्र, तालुक्याच्या बहुतांश भागात जनावरांच्या चाऱयाची वानवा आहे. पशुधनाच्या पाणी आणि चाऱयासाठी शेतकऱयांची धावाधाव सुरू आहे.
तालुक्यातील तलावांमध्ये खडखडाट
n तालुक्यातील येरळवाडी, कानकात्रे, पळसगाव, सूर्याचीवाडी, कलेढोण (कटकाळी तलाव), विखळे कटकाळी तलाव, पाचवड, तरसवाडी तलाव, येळीव, दरुज दरजाई तलाव, पेडगाव तलाव, वाकेश्वर बंधारा, वडूज येथील बंधारा कोरडा पडला आहे. वेळीव, पेडगाव, सातेवाडी, डांभेवाडी, कानकात्रेवाडी तलावांमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. मायणी फिडिंग पॉइंट, शिरसवडी ग्रामपंचायत विहीर, बनपुरी खासगी कूपनलिका, नेर धरणातील विसापूर, पवारवाडी ग्रामपंचायत विहिरींमधून सध्या टँकर भरले जात आहेत.
41 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा
n पाणीच नसल्याने उन्हाळी तसेच बागायती पिके वाया जाऊ लागली आहेत. फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील पाणीसाठे कोरडे पडल्याने कूपनलिकांचेही पाणी बंद झाले आहे. त्यामुळे टँकर मागणीचे प्रस्ताव वाढू लागले आहेत. खटाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मायणी फिडिंग पॉइंटवरून पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. 41 गावे, 107 वाडय़ा-वस्त्यांना 30 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 66 हजार 295 लोकसंख्येला आणि 12 हजार 141 जनावरांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. 19 गावांना विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहण करून पाणी दिले जात आहे. आणखी काही गावांचे टँकरसाठीच्या प्रस्तावांची मागणी होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List