मोदींनी 10 वर्षांत देशावर 210 लाख कोटींचे कर्ज केले; जयंत पाटील यांचा हल्लाबोल
नरेंद्र मोदी सत्तेवर येण्यापूर्वी देशावर 56 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते; ते त्यांनी 10 वर्षांत 210 लाख कोटी रुपयांवर नेले. त्यांनी शेतकऱयांना कर्जमाफी दिली नाही. युवक व महिलांसाठी उद्योग-रोजगार निर्माण केला नाही, तर देशातील मूठभर श्रीमंतांची 25 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास देशावरील कर्जे कमी करण्यासाठी जीएसटीसारखे कर वाढवू शकते, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे जाहीर सभा झाली. यावेळी राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे, तानाजीराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शिवसेनेचे शकील सय्यद, योजना पाटील, अलका राजे उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, देशातील लोकशाही आणि संविधान टिकविण्यासाठी तसेच बहुजनांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करा. एखाद्या शेतकऱयाने 1 लाखाची खते घेतली, तर त्यातून 18 हजार जीएसटी कर घेऊन शेतकऱयांना 6-6 हजार देत आहेत. ही पाकीटमारी आहे. सत्यजित पाटील हा नवा चेहरा दिला आहे. कामाचा माणूस आहे. त्यांना मतदान करून महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
सत्यजित पाटील म्हणाले, जर आपण या निवडणुकीत गाफील राहिला, तर कदाचित ही शेवटची लोकसभा निवडणूक ठरू शकते. सत्ताधारी भाजपाने गेल्या 10 वर्षांत असे कोणते काम केले आहे, त्याच्या जोरावर हे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याची अपेक्षा करीत आहेत? यांना पुन्हा सत्तेवर येण्याची खात्री नसल्याने सत्तेचा गैरवापर आणि दुसरे पक्ष फोडत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
प्रतीक पाटील म्हणाले, सत्ताधारी भाजपाकडे जाहिराती करायला कोटय़वधी रुपये आहेत. मात्र, शेतकऱयांची कर्जमाफी करायला त्यांच्याकडे पैसा नाही. ही मंडळी तुमच्या गावात येतील, तेव्हा त्यांना महागाई कमी करणार होता, भ्रष्टाचार संपविणार होता, युवकांना नोकऱया देणार होता, त्याचे काय झाले? असा प्रश्न विचारा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List