दोषी संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांना पैसे देणार
संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव वाफारेसह 10 जणांना न्यायालयाने सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, ‘आमच्या पैशांचे काय’, असा सवाल ठेवीदारांनी केला होता. त्यावर आता संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे देण्यात येणार आहेत. तर, कर्जदारांच्या मालमत्ता जप्त केल्या जाणार असल्याची माहिती अवसायक मंडळाकडून देण्यात आली.
संपदा पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर सन 2011 मध्ये संबंधित पदाधिकारी आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संस्थेवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली होती. संस्थेत ठेवीदारांच्या सुमारे 32 कोटींच्या ठेवी अडकल्या असून, प्रशासकीय काळात काही प्रमाणात वसुली होऊन त्यातून ठेवींच्या रकमा परत करण्याची कार्यवाही करण्यात आली. मागील दोन वर्षांत 2 ते 3 कोटी रुपयांच्या ठेवींची रकम परत करण्यास अवसायक मंडळाला यश आले आहे. मात्र, अद्यापही 28 ते 30 कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. ठेवींची रक्कम परत मिळण्यासाठी ठेवीदारांना आतापर्यंत मोठा संघर्ष करावा लागला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाने ठेवीदारांना ठेवी परत मिळू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यासाठी सध्याचे अवसायक मंडळ प्रयत्नशील आहे.
संस्थेवर सहायक निबंधक डी. ए. घोडेचौर याच्या अध्यक्षतेखाली अवसायक मंडळ नियुक्त असून, या मंडळाने संचालक, कर्जदारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत वसुलीवर भर दिला आहे. संस्थेची स्वतःची मालमत्ता नाही. त्यामुळे दोषी संचालकांच्या मालमत्तांवर बोजा चढवणे, त्या जमा करून त्याचा लिलाव करणे आणि त्यातून येणाऱया पैशांतून ठेवीदारांचे पैसे देण्याचा पर्याय अवलंबिण्यात येत आहे. त्याचबरोबर थकबाकीदार कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव केला जाणार आहे.
संचालकांच्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने त्यात वेळ जात आहे. ठेवीदारांनी अशा लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावा, लिलावातून रकमा वसूल करून त्यातून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जाणार आहेत, असे अवसायक मंडळाचे अध्यक्ष घोडेचौर यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List