IPL 2024 : ‘पॉवर’ गेममध्ये हैदराबाद विजयी, दिल्लीच्या पराभवाचा ‘पंच’

IPL 2024 : ‘पॉवर’ गेममध्ये हैदराबाद विजयी, दिल्लीच्या पराभवाचा ‘पंच’

इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामामध्ये सनरायझर्स हैदराबादचा संघ धावांचा पाऊस पाडत आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत हैदराबादने 267 धावांचा डोंगर उभारला आणि त्यानंतर दिल्लीला 199 धावांमध्ये रोखत 67 धावांनी विजय मिळवला. 32 चेंडूत 89 धावांची खेळी करणारा हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हीस हेड याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

हैदराबादने विजयासाठी दिलेल्या बलाढ्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. डेव्हीड वॉर्नर 1 आणि पृथ्वी शॉ 16 धावा काढून बाद झाला. 2 बाद 25 असा संकटात सापडलेला दिल्लीचा डाव जेक फ्रेझर-मॅकगर्क याने सावरला. चौकार-षटकारांची आतषबाजी करत त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकले.

दुसऱ्या बाजूने अभिषेक पोरेल यानेही त्याला चांगली साथ दिली. दोघांनी संघाचे शतक फलकावर लावले. मात्र हाणामारीच्या नादात जेक फ्रेझर-मॅकगर्क बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 18 चेंडूत 5 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 65 धावा कुटल्या. ही जोडी फुटल्यानंतर हैदराबादने सामन्यावर पकड मजबूत केली. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने एक बाजू लावून धरत 35 चेंडूत 44 धावा केल्या, मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. त्यामुळे दिल्लीचा संघ 19.1 षटकांमध्ये 199 धावांमध्ये गारद झाला.

हैदराबादकडून टी नटराजन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नितीश रेड्डी आणि मयंक मार्कंडेय यांना प्रत्येकी दोन, तर वाशिंग्टन सुंदर आणि भुवनेश्वर कुमार यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकरांना ट्रेव्हीस हेड आणि अभिषक शर्माची अविस्मरणीय खेळीचा आनंद लुटता आला. हेड आणि शर्माने पहिल्या 6 षटकांमध्ये विक्रमी 125 धावा जोडल्या. सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्मा बाद झाला. त्याने अवघ्या 12 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंतर मार्करमही आल्यापावली माघारी परतला. मात्र दुसऱ्या बाजूने हेडने तलवारीसारखी बॅट फिरवत प्रत्येक चेंडूवर प्रहार सुरुच ठेवला. हेड यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान शतक ठोकणार असे वाटत असतानाच कुलदीप यादव याने त्याला बाद केले. हेडने 32 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटाकरांची आतषबाजी करत 89 धावा केल्या. त्यानंतर शाहबाज अहमद यानेही 29 चेंडूत 59 धावा करत संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;