प्रेरणेच्या पायवाटा – प्रेरणा निसर्गाची

प्रेरणेच्या पायवाटा – प्रेरणा निसर्गाची

>>डॉ. अनिल कुलकर्णी

कुंडीतील सदाफुली बहरली होती. टवटवीतपणे डोलताना डोळय़ांना सुख देत होती. प्राप्त परिस्थितीमध्ये मिळेल तेवढय़ा पाण्यावर, मिळेल तेवढय़ा जमिनीवर फुलायचं हे वनस्पतीपासून शिकायला हवं. कडय़ाकपारीत बीज रुजतं आणि वाढतं. कसल्याही तक्रारी न करता या वनस्पती वाढतात. बीज अंकुरतात. कुठली प्रेरणा कोणाकडून घेतात? काहीच कळत नाही. आपल्याला त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी की प्राप्त परिस्थितीतसुद्धा ती समाधानी असतात. त्याही परिस्थितीत त्यांना फुलायचं व दुसऱयांना आनंद द्यायचा असतो. कसलीही तक्रार नाही, कसलीही खदखद नाही. मिळेल तेवढय़ात खुश राहायचं, दुःख उगाळायचं नाही.

कुंडीतील झाडाला पाणी टाकण्याचं काम आजी करते. आजी गावाला गेल्यावर कुंडीतील पानंफुलं थोडी सुकून जातात. पण आज आजी येणार आहे म्हटल्यावर ती पुन्हा तरतरीत होतात. कुठले ऋणानुबंध? रानफुलाकडे तर कोणीच लक्ष देत नाही, पण तरीही ती फुलतात आणि दुर्लक्षिली जातात याबद्दल त्यांची काहीही तक्रार नसते. फुलांना फक्त फुलायचं माहीत असतं. निर्माल्य होईपर्यंत फुलायचं असतं व आपल्या सुगंधाने आसमंत बहरून टाकायचा हे त्यांच्याकडून शिकायला हवं. सौंदर्यवतीच्या गजऱयात स्थान मिळणार आहे की देवाच्या चरणी स्थान मिळणार आहे, की प्रेतावर उधळले जाणार… याची काही कल्पना नसताना फुलं निर्माल्य होईपर्यंत आनंद देतात. वनस्पती कधीच म्हणत नाहीत की, मी आहे तिथेच मला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, मी येथूनच वाढणार. वनस्पती सूर्यप्रकाशाकडे जाण्यासाठी वेळप्रसंगी स्वतला नमवून घेतात, तडजोड करतात. प्राजक्त दुसऱयाचं अंगण सजवतो, दुसऱयाच्या अंगणात सडा पाडतो.

फुलांचं आयुष्य किती? पण जेवढं आयुष्य त्यांना लाभतं, तेवढय़ा आयुष्यात ते अनेकांचे संसार बहरून टाकतात. फुलांवर कितीतरी गाणी झाली आहेत. ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ हे शब्दरूप देणारं गाणं किती भावोत्कट आहे. आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फूल दिले की, मनातल्या भावना कळतात. गुलाबांनी अनेकांना जवळ आणलं आहे. पंडित नेहरूंच्या कोटावर गुलाब नेहमी विराजमान असायचा. एखादं फूलसुद्धा एखाद्या व्यक्तिमत्त्वाची ओळख बनतं.

‘मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, कळियासी आला’, ‘चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना’, या गाण्यांनी मानवी जीवनाला बहर आणला. अनेक फुलांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून पुस्तकात किंवा वहीत स्वतला बंदिस्त करून समाधी घेतली आहे.

रातराणी, केवडा, निशिगंधा, मोगरा या फुलांनी केवळ सुगंध दिला नाही, तर मानवी मनाला एका वेगळ्या पातळीवर नेऊन प्रेम करायला प्रवृत्त केलं आहे. फुलं केवळ गजरा माळत नाहीत किंवा देवाला सुशोभित करत नाहीत, तर सर्व आसमंत भारावून टाकतात, प्रसन्न करतात. कुठून आलं हे कौशल्य? कुठून आलं हे नक्षत्रांचं देणं?

‘अजून त्या झुडपांमागे सदाफुली दोघांना हसते, अजून त्या आठवणींनी शेवंती लजवंती होते’, ‘फुल तुम्हे भेजा है खत मे फूल नही मेरा दिल है’, ‘फूलों का तारों का सबका कहना है एक हजारो मे मेरी बहना है’, ‘फुलले रे क्षण माझे, फुलले रे’, ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’ ही आणि अशा अनेक कविता, गाणी आजच्या पिढीला माहीत असायला हवी व त्यांनी त्याचा आस्वादही घ्यायला हवा. अनेक कवींनी फुलांची दखल घेतली आहे हे आजच्या पिढीला कळायला हवं.

वनस्पती, फुलांनाही भावना असतात. वनस्पती फुलांशीसुद्धा संवाद साधायला हवा. पर्यावरण वाचलं तर वनस्पती, फुलं वाचतील. फुलं आपल्यासाठी इतकं करतात, पण आपण फुलांसाठी काय करतो? ग्रेटा उपोषण करते, स्वतला अटक करून घेते. लहान वयातही पर्यावरणाची इतकी समज हे प्रेरणादायी नव्हे काय? कविता केवळ पाठ करण्यासाठी किंवा कवितेवरील गाणी गुणगुणायची नसतात, तर त्यातून निसर्गाविषयी प्रेम निर्माण करायला हवं. कवितासुद्धा जशी आस्वादायची असते. फुलांच्या माध्यमातून निसर्ग आस्वादायचा असतो. निसर्ग आपल्याला प्रेरणाच देतो. एवढंच की, निसर्गाची प्रेरणेची पायवाट अदृश्य असते.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;