मराठवाड्याला वादळवार्‍याने झोडपले! विजांच्या कडकडाटात पावसाचे धुमशान

मराठवाड्याला वादळवार्‍याने झोडपले! विजांच्या कडकडाटात पावसाचे धुमशान

दिवसभर रणरणत्या उन्हाने हैराण झालेल्या मराठवाड्याला सायंकाळी वादळीवार्‍यासह तुफान पावसाने झोडपून काढले. अचानक विजांच्या कडकडाटात तुफान पाऊस सुरू झाल्याने लोकांची दाणादाण उडाली. लातुरात वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला असून बीड, धाराशिवमध्ये फळबागा आडव्या झाल्या. अनेक ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांब कोसळल्याने वीज बेपत्ता झाली. रात्री उशिरापर्यंत शेकडो गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य होते.

मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून तापमान चाळिशीपार गेले आहे. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्मा होता. सायंकाळी अचानक आभाळात काळ्याकभिन्न ढगांची दाटी झाली आणि बघता बघता वादळी वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, लातूर, हिंगोली, जालना, धाराशिवला पावसाने झोडपून काढले. सोसाट्याच्या वार्‍याने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले. हिंगोली शहरासह कळमनुरी. औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत परिसरालाही पावसाने झोडपून काढले. अवकाळीमुळे काढणीला आलेल्या हळदीचे नुकसान झाले.

नांदेड जिल्ह्यात सिडको, तरोडा, मालेगाव, अर्धापूरचा परिसर, नांदेड शहर, तुप्पा, विष्णूपुरी, सोनखेड, लोहा परिसरात हलका पाऊस झाला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शहर आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तरोडा, सिडको, विष्णूपुरी भागातील वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला. बीड जिल्ह्याला आठवड्यात तिसर्‍यांदा अवकाळीने झोडपले आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि तुफान पावसाने दाणादाण उडाली. लातूर जिल्ह्यातही वादळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. ग्रामीण भागात अनेकांच्या घरांवरील पत्रे, कडब्याच्या बनमीवर झाकलेले प्लास्टिक उडून गेले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. औसा, चाकूर, नणंद आदी ठिकाणी पावसाने पिकांचे नुकसान झाले. चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे सार्थक संतोष ढोले (21) हा शेतात काम करत असताना वीज पडून ठार झाला. धाराशिव, लोहारा, उमरगा आदी परिसरालाही वादळी पावसाने जबर तडाखा दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;