गोळीबाराच्या घटनेनंतर कडक सुरक्षेसह सलमान खान दुबईला रवाना; पहा व्हिडीओ
घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता सलमान खानला पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. रविवारी 14 एप्रिल रोजी सलमानच्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर आता पहिल्यांदा सलमान घराबाहेर पडला आहे. सोशल मीडियावर त्याचे काही व्हिडीओ समोर येत आहेत. यामध्ये सलमान कॅज्युअल आऊटफिटमध्ये दिसत आहे.
कारमधून उतरल्यानंतर सलमान मोठ्या सुरक्षेसह एअरपोर्टच्या गेटमधून आत जातो. यावेळी त्याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड शेरासुद्धा आहे. आजूबाजूला पोलिसांची प्रचंड सुरक्षा असतानाही सलमानने पापाराझींकडे पाहून मान हलवली. सलमान दुबईला निघाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी सलमानची सुरक्षा तपासण्यात आली आणि ती अधिक मजबूत करण्यात आली. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरही सुरक्षा वाढवली, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.
गोळीबारप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. दोघांनाही गुजरातमधील भूज शहरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहपोलीस (गुन्हे) आयुक्त लखमी गौतम यांनी दिली. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावं असून त्यातील पाल याने अद्ययावत पिस्तुलाने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला.
सलमानला घाबरवण्यासाठी बिष्णोईकडून आरोपींना गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी दोन्ही आरोपींना आधी एक लाख रुपये मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. काम फत्ते झाल्यानंतर आरोपींना आणखी तीन लाख रुपये मिळणार होते. विकी गुप्ता हा दहावी पास असून सागर पाल आठवी शिकलेला आहे. सलमानच्या घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार केल्यानंतर ते रात्रभर वांद्रे इथल्या बँडस्टँड परिसरात फिरत होते. त्यातील एक आरोपी लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या थेट संपर्कात होता. त्यामुळे याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List