पालिका कर्मचाऱयांच्या मुलांना 25 हजार शैक्षणिक भत्ता द्या, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी
केंद्र सरकारी कर्मचाऱयांच्या मुलांना सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार 25 हजार रुपये शैक्षणिक भत्ता दिला जातो. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱयांच्या मुलांनादेखील 25 हजार रुपये शैक्षणिक भत्ता देण्यात यावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱयांना वेतन व भत्ते केंद्र सरकारच्या वेतन आयोगानुसार दिले जातात. केंद्र सरकारने केंद्रातील कर्मचाऱयांना वेतन आयोग लागू केला की, सदर वेतन आयोग राज्य सरकार राज्यातील कर्मचाऱयांनाही लागू करतात व त्यानंतर राज्य सरकारच्या धर्तीवर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱयांना वेतन आयोग लागू केला जातो. त्यामुळे पालिका कर्मचाऱयांच्या मुलांनादेखील केंद्र सरकारनुसार शैक्षणिक भत्ता देण्यात यावा, अशी मागणी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
मागील काही वर्षांमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱयांच्या विविध भत्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत. पालिका कर्मचाऱयांच्या मुलांना सध्या मिळत असलेली शैक्षणिक भत्ता रक्कम हा केवळ सहा हजार रुपये आहे. म्हणूनच केंद्र सरकार सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱयांच्या मुलांना जेवढा शैक्षणिक भत्ता देते, तेवढाच पालिका कर्मचाऱयांच्या मुलांनाही मिळायला हवा, अशी कर्मचारी कामगार सेनेची मागणी आहे. या वेळी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे प्रमुख सल्लागार दामोदर पांडकर उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List