कथित बनावट गुणपत्रिका प्रकरण; मुंबई विद्यापीठ करणार पोलिसांत तक्रार
मुंबई विद्यापीठाच्या कथित बनावट गुणपत्रिका प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका 10 ते 12 हजारांत घरी बसून मिळेल, अशी जाहिरात समाजमाध्यमावर आली होती. त्यानुसार पुणे येथील एका व्यक्तीने काही रक्कम दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हॉटसअॅपवर एक बनावट गुणपत्रिका मिळाली, याची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. यावर लवकरच मुंबई विद्यापीठ पोलीस स्थानकांमध्ये सायबर तक्रार नोंदविणार आहे.
विद्यार्थ्यांनी अशा बनावट गुणपत्रिका व पदवी देणाऱयांपासून सावध रहावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे. पुणे येथील एका व्यक्तींने फेसबुक या समाज माध्यमावर मुंबई विद्यापीठाची पदवी घरी बसून एका दिवसात 10 ते 12 हजारांत मिळेल, अशी जाहिरात पाहिली. त्याने त्या जाहिरातीतील पह्नवर एका व्यक्तीशी संपर्क केला असता त्याने 2000 रुपये अॅडव्हान्स मागितले. अॅडव्हान्स रक्कम भरल्यानंतर त्याच्या व्हॉटसअॅपवर मुंबई विद्यापीठाची बीएससीची एक कथित बनावट गुणपत्रिका मिळाली, अशी माहिती मुंबई विद्यापीठास प्राप्त झाली. याची दखल मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी घेतली व पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
अशा प्रकारच्या कोणत्याही फसव्या जाहिरातीला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. ही पदवी किंवा गुणपत्रिका बनावट आहे. पह्टोशॉप किंवा इतर साधनाचा वापर करून बनावट गुणपत्रिका किंवा पदवी बनविली आहे. यासोबत ज्या व्यक्तींनी गुणपत्रिका घेतली आहे तीच बनावट आहे. एप्रिल 2023ची बीएससी सत्र-6ची कथित गुणपत्रिका असून त्यावर स्वाक्षरी मात्र यापूर्वीच्या जुन्या परीक्षा संचालकांची आहे. यामुळेच अशा बनावट गुणपत्रिका व पदवी देणाऱयांपासून सावध रहावे तसेच पदवी देणाऱयांवर व पदवी घेणाऱयांवर मुंबई विद्यापीठ कायदेशीर कारवाई करणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List