सलमान खान गोळीबार प्रकरण , दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी
अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या गुजरातमधून आवळल्या आहेत. ४८ तासांच्या आत त्यांना भुज येथून अटक करण्यात आली. त्यांना आज मुंबईत आणण्यात आले आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी दोन आरोपींची नावे असून सागर पाल याने हा गोळीबार केला होता.
14 एप्रिलला झाला होता गोळीबार
14 एप्रिल रविवारी पहाटे 5 च्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली. गोळीबार करुन गुजरामधील भुज जिल्ह्यात आरोपी पळाले होते. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी हे बिहारमधील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तातडीने पावले उचलली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तपासासाठी 20 पथके तयार केली होती. पोलीस तपासातून नवनवीन खुलासे समोर येत होते. दोन्ही आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार ते पाच गोळ्या झाडल्या होत्या.
हल्लेखोर पनवलेमध्ये थांबले होते
पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीतून बरीच माहिती समोर आली आहे. हे दोघेही हल्लेखोर पनवेल परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी ते हरिग्राम येथील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन वास्तव्यास होते. तेथील घर मालकाशी केलेल्या करारनाम्याच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी नवीन पनवेलमधील एका दुचाकी शोरूममधून गाडी विकत घेतली व त्यासाठीसुद्धा त्यांनी तीच कागदपत्र सादर केली होती.
घरामालकाची चौकशी
मुंबई पोलीस, क्राईम ब्रांच, ATS व स्थानिक पोलीस यांनी आरोपींचा कसून शोध घेतला. पनवेलमधील वास्तव्य उघडकीस आल्यानंतर त्या अपार्टमेंटमधील घराचा मालक तसेच जी दुचाकी वारली त्याच्या शोरूमच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. घर मालकाचे नाव राहुल भोपी आहे. आरोपींना घर भाड्याने देताना करारनामा झाला होता का? करारनाम्यासाठी आरोपींनी दिलेली कागदपत्रे खरी होती की खोटी ? याचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांचा तपास चोहोबाजूने सुरु असताना आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
शूटर्स सापडले पण हत्यार नाही, पोलिसांकडून शोध सुरू
दरम्यान याप्रकरणी बॅलिस्टिक रिपोर्टसाठी गोळीबारासाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल मिळणं महत्वाचं आहे. माता का मढ मंदिर परिसरात कसून शोध घेतल्यावर पोलिसांनी दोन्ही आरोपींना तर अटक केली. पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सलमनाच्या घराबाहेर ज्या पिस्तूलातून गोळीबार केला, ती पिस्तुल काही पोलिसांना अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही. आरोपींच्या झडतीत कोणतेही हत्यार सापडले नाही. चौकशीत आरोपी उघडपणे काही सांगत नाहीत. गोळीबारानंतर फरार होताना आरोपींनी हत्यार कुठेतरी लपवून ठेवल्याचा किंवा फेकून दिल्याचा संशय आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात पिस्तूल शोधणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पोलिसांना जिवंत काडतूसही सापडले असून, बॅलेस्टिक अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List