गेली वाघीण कुणीकडे…
अंधारी व्याघ्र प्रकल्पातून नुकतीच एक वाघीण नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आली होती. ही वाघीण बेपत्ता झाली असून तिच्या गळय़ातील सॅटेलाईट कॉलर जंगलात आढळून आल्यामुळे वन विभागात खळबळ माजली आहे. बेपत्ता वाघिणीचा शोध सुरू आहे.
नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढावी यासाठी 20 मे 2023 रोजी ताडोबातून नागझिरा अभयारण्यात नर आणि मादी अशा दोघांना सोडण्यात आले होते. त्यानंतर नुकतेच 11 एप्रिल रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एका दोन वर्षीय वाघिणीला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडून तिचे पुनर्वसन करण्यात आले.
ही मादा एन टी-3 वाघीण असून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात तिला निसर्गमुक्त करण्यात आले होते. या वाघिणीच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी तिला सॅटेलाईट जीपीएस कॉलरही लावण्यात आले होते. त्यावरून गेले दोन दिवस तिच्यावर लक्ष ठेवण्यात आले.
शिकार झाल्याचा संशय
तिला लावण्यात आलेले जीपीएस कॉलर जंगलात सापडले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱयांनी पाहणी केली असता सॅटेलाईट जीपीएस कॉलर नागझिरा अभयारण्यातील कक्ष क्रमांक 95 मध्ये जमिनीवर पडलेले आढळले. त्यामुळे जीपीएस कॉलर आयडी वाघिणीने काढले की तिची शिकार झाली, यादृष्टीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी वाघिणीचा शोध घेत आहेत. दरम्यान, तो कॉलर आयडी वाघिणीने काढला असावा किंवा तिची शिकार तर झाली ना, असे अनेक प्रश्न वन अधिकाऱयांना पडले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List