देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे लोक फासावर चढले; RSS, भाजपचे लोक कुठे होते ? मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे लोक फासावर चढले; RSS, भाजपचे लोक कुठे होते ? मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल

काँग्रेसची लढाई भाजपा, नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून मनुवादी विचारधारेच्या विरोधात आहे, देशाचे संविधान व लोकशाही कायम राखण्यासाठी आहे. आम्हाला हिटलर बनायचे नाही, देशात सर्व धर्माचे लोक एकत्र रहावे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवले आहे. काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, देशासाठी काँग्रेसचे लोक फासावर चढले, नरेंद्र मोदींच्या भाजपाचे लोक स्वातंत्र्य चळवळीत कुठे होते ? स्वातंत्र्यांच्या लढाईवेळी आरएसएसचे लोक कुठे लपून बसले होते? असे सवाल करून लोकसभा निवडणुकीत मनुवादी विचाराच्या सरकारचा पराभव करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे.

नागपूरचे काँग्रेस पक्षाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपा धर्माच्या नावावर मते मागत आहे, काँग्रेसला राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण दिले पण ते आले नाहीत असा खोटा प्रचार नरेंद्र मोदी करत आहेत. प्राणप्रतिष्ठेचे काम साधू संतांचे आहे पण हे नवीनच साधू निघाले आहेत. दलित समाजाला आजही मंदिरात प्रवेश मिळत नाही तर तर मी एकटा मंदिरात कसे जाऊ? नवीन संसदेच्या पायाभरणीला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बोलावले नाही. नवीन संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही, राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले नाही. ते राष्ट्रपती असूनही मागासवर्गीय असल्याने भाजपा व मोदींनी त्यांना न बोलावून दलित समाजाचा अपमान केला. मोदी व भाजपा एससी, एसटी, आदिवासी समाजाचा सातत्याने अपमान करत आहेत, हा अपमान आधी बंद करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान भाजपानेच कायम ठेवले असे नरेंद्र मोदी सांगत आहेत, ते साफ खोटे आहे. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, पंडित नेहरु यांनी संविधान बनवण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवली व ते संविधान आजपर्यत काँग्रेस पक्षाने टिकवून ठेवले आहे. आरएसएसच्या कार्यालयात बाबासाहेबांचा फोटोही लावत नाहीत व कालपर्यंत देशाचा तिरंगा झेंडाही आरएसएसच्या कार्यालयावर फडकवला नाही.

भाजपाचे सरकार आले तर दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते, 10 वर्षातील 20 कोटी नोकऱ्या कुठे गेल्या हे आता गडकरी व मोदींना विचारा. परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देतो म्हणाले पण हे पैसेही मिळाले नाहीत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलतात, खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपाची पद्धत आहे. भ्रष्टाचाऱ्यांना जवळ करु नका असे म्हणणाऱ्या मोदींनीच 23 भ्रष्ट नेत्यांना भाजपात घेतले. विरोधी पक्षात होते तोपर्यंत भ्रष्टाचारी आणि भाजपात आले की पवित्र झाले का? असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्यात 5 न्याय व 25 गॅरंटी दिल्या आहेत. 30 लाख सरकारी नोकऱ्या, गरिब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवणार, कामगारांचे अधिकार व हक्क कायम करणार, सामाजिक सुरक्षा देणार. शेतमालाला एमएसपीचा कायदा, पीकविम्याचे पैसे 30 दिवसात देणार. जीएसटीमुक्त शेती करण्याची गॅरंटी काँग्रेसने दिलेली आहे. काँग्रेसची गॅरंटी वॉरंटीसहित आहे, मोदी गँरंटीसारखी खोटी नाही, असे खर्गे म्हणाले.

प्रचार सभेआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिक्षाभूमीला भेट देऊन राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

नागपुरमधील या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, AICC चे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, अनिस अहमद, आमदार वजाहत मिर्झा, आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, बंटी शेळके, अतुल कोटेचा, गिरिश पांडव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते , पदाधिकारी व नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;