वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांकडून मारहाण
मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील बिओरा येथे वी़ज बिलाची थकीत रक्कम न भरल्याने वीज कनेक्शन तोडण्यसाठी काही अधिकारी आले होते. यावेळी तेथील महिलांनी व पुरुषांनी वीज कनेक्शन काढण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याचा भयंकर प्रकार घडला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर मालवीय असे त्या पीडित विद्युत अधिकाऱ्याचे नाव आहे. सागर मालवीय यांनी सांगितले की, 29 जानेवारी रोजी दक्षता पथकाने बिओरा येथील रहिवासी जमिला खातून यांच्याविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी आमचे काही अधिकारी त्यांच्याकडून 98 हजार दोनशे सात रुपये वसूल करण्यासाठी तेथे गेले होते. यावेळी संपूर्ण रक्कम जमा करता येत नसल्याचे कारण देत जमिला यांनी 40 हजार रुपये जमा केले होते. उर्वरित 58हजार रुपये 25 फेब्रुवारीपर्यंत जमा करेन असे त्यांनी सांगितले. परंतु ही रक्कम वेळेत न भरल्यामुळे आम्हाला कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले असे ते म्हणाले.
शनिवारी वीज अधिकारी सागर मालवीय यांच्यासह लाइन हेल्पर भोनीसिंग यादव, सुनील सक्सेना, महेश मेहर आणि चालक विनोद वर्मा कनेक्शन तोडण्यासाठी गेले. घटनास्थळी पोहोचताच जमिला खातून व त्यांची मुलगी टीना आणि अन्य काही लोकांनी मिळून त्या वीज अधिकाऱ्यांवर लाठीहल्ला केला. त्यामुळे लगेचच वीज अधिकाऱ्यांनी पोलिसांना याप्रकाराची माहिती दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. तसेच आरोपी महिला जमिला खातून आणि तिच्या अन्य सोबतींविरोधात पोलिसांनी विद्युत कायदा आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List