एकाच व्यक्तीच्या हातात देश गेला तर तो देशाचा गळा घोटेल! उद्धव ठाकरे यांचा घणाघात
महाराष्ट्र आणि देशभरात नरेंद्र मोदी सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. जो देईल साथ, त्यांचा करू घात अशी व्यक्ती, अशा पक्षाचे सरकार आता नको. एका व्यक्तीच्या हातात देश दिल्यास तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही. हुकूमशहांना पुन्हा स्वीकारणे आता देशासाठी घातक आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले. सर्वांना सोबत घेऊन चालणारे संमिश्र सरकार आता देशाला हवे आहे आणि ‘इंडिया’ आघाडीच देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकते, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बीआरएसचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील आणि त्यांच्या शेकडो समर्थकांबरोबरच जळगावमधील भारतीय जनता पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि मिंधे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजप, वंचित, मिंधे गट आणि बीआरएसमधून प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी पेंद्र सरकारच्या कारभाराला पंटाळून शिवसेनेत आलेले आहेत. देशात ‘इंडिया’ आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी असावी अशा एकमेव आशेपोटी ते शिवसेनेला मोठा विजय मिळवून देण्यासाठी आले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे कार्यकर्ते आल्याने जळगावात शिवसेनेची ताकद वाढली आहे, असे ते पुढे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप, मोदी सरकार आणि मिंधे सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकारविरुद्ध देशभरात प्रचंड असंतोष आहे आणि विशेषकरून गेल्या दहा वर्षांनंतर तो उघडउघड दिसू लागला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या जनतेच्या भावना आहेत आणि शिवसेना नेहमीच जनभावनेसोबत राहिलेली आहे, असे ते म्हणाले. मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीवर प्रहार करतानाच, भाजपची एकाधिकारशाही ही देशासाठी घातक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
…ही नाटपं आता जनता ओळखते
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचा मुद्दा माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, काही बिनशर्त पाठिंबा देताहेत तर काही लढण्याचे नाटक करून देत आहेत, पण ही नाटपं आता जनता ओळखते, असा जबरदस्त टोला लगावला. यावेळी हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई लोकसभेत होणार आहे, असे ते म्हणाले.
संमिश्र सरकार हवे
एकेकाळी वाटायचे संमिक्ष सरकार नको. पण अटलिबहारी वाजपेयी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनीही संमिश्र सरकार उत्तमपणे चालवले होते. अपवाद सोडला तर संमिश्र सरकारच्याच काळात बहुतेक वेळा देशाची प्रगती अधिक चांगल्या प्रकारे झाली आहे, असे यावेळी सांगत उद्धव ठाकरे यांनी संमिश्र सरकारच हवे यावर भर दिला.
उमेदवारांचा पत्ता नाही आणि महायुती सभा घेत सुटलीय
महायुतीच्या संयुक्त प्रचारसभांना सुरुवात झाली असून महाविकास आघाडीच्या तशा प्रचारसभा कधी सुरू होणार असा प्रश्न यावेळी माध्यमांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचारसभांवर टीका केली. ते म्हणाले की, महायुतीच्या सभा जरी सुरू असलेल्या तरी त्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही. अनेक उमेदवारही जाहीर झालेले नाहीत. उमेदवारांचा पत्ता नाही आणि सभा घेत सुटलेत याला अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांचा धडाका लवकरच
महाविकास आघाडीने आपल्या जागावाटपाची आणि उमेदवारांची घोषणा केली आहे. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या पातळीवर प्रचाराच्या कामाला सुरुवातही केली आहे. लवकरच संयुक्त प्रचारसभांचा धडाकाही सुरू होईल, असे सांगतानाच आघाडीतील सर्व पक्ष एकत्रितपणे प्रचार करणार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सांगली मतदारसंघातील परिस्थितीबाबतच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सांगली मतदारसंघातील जागावाटप झालेले असल्याने आता प्रत्येक पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना समजावण्याची आवश्यकता आहे. आगामी निवडणुकीत मोठे चित्र पाहायचे असेल तर ते आवर्जून करावे लागेल, असा सल्लाही त्यांनी घटकपक्षांना दिला.
शिवसेना घोसाळकरांच्या मनात
विनोद घोसाळकर यांना उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याची ऑफर मिळाल्याची चर्चा आहे असे माध्यमांनी विचारले. त्यावर घोसाळकर हे शिवसेनेचे जुने व कट्टर कार्यकर्तेच नव्हे तर त्यांच्या मनामध्ये शिवसेना आहे, दुसऱया पक्षातून उमेदवारी घेऊन ते लढतील असे कदापि शक्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भारत सरकार हवे, मोदी सरकार नको
या देशाचे सरकार भारत सरकार आहे. आम्हाला भारत सरकार हवे आहे, मोदी सरकार नको, असेही उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेला बेकारीने ग्रासले आहे, महागाईने त्रासले आहे. त्यामुळे एका व्यक्तीचे सरकार आता जनता कदापि मान्य करू शकणार नाही, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेला नकली म्हणणाऱयांनो, तुम्हाला मेकअपची गरज का लागतेय?
शिवसेनेला नकली म्हणणाऱया भाजप नेत्यांचाही समाचार यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा घेतला. शिवसेनेला नकली म्हणणाऱयांनो, तुम्हाला एवढी लोपं भाडय़ाने का घ्यावी लागत आहेत, तुमच्या इंजिनाची चाके निखळलीत आणि स्टेपनीवर इंजिने चालवताय का, तुमची ओरिजिनल लोपं गेली कुठे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपला पंटाळून त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेत का येत आहेत याचा विचार त्यांच्या पक्षनेतृत्वाने करावा, असा सल्ला देतानाच, जुन्या नात्याने सांगतोय, स्वतःचा चेहरा आरशात बघा आणि तुम्हाला मेकअपची का गरज लागतेय त्याचा विचार करा, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला बजावले.
आम्हाला मजबूत सरकार हवे, पण ते संमिश्र हवे. कणखर नेता हवा, पण तो सर्वांना सोबत घेऊन चालणारा हवा. भाजप संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागलाय. सर्वांना पह्डून टाकण्याचा प्रयत्न करतोय. ही वृत्ती देशासाठी घातक आहे.
भाजपने देशाला नव्हे तर इतर पक्षांना भ्रष्टाचारमुक्त केले
गेल्या दहा वर्षांत दिलेली कोणतीही आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केलेली नाहीत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारने पूर्ण न केलेल्या आश्वासनांचा पाढाचा वाचला. बेरोजगारांना रोजगार देऊ सांगितले, पण मिळालाच नाही, 15 लाख रुपये एकाही नागरिकाच्या बँक खात्यात पोहोचलेले नाहीत, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करू सांगितले, पण शेतमालाला भाव नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी सरकार देशाला भ्रष्टाचारमुक्त करणार होते, पण भाजपने इतर पक्षांतील भ्रष्टांना स्वतःच्या पक्षात घेऊन ते पक्ष मात्र भ्रष्टाचारमुक्त केले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List