तेथे कर माझे जुळती! शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची रीघ
कोट्यवधी मनांत मराठी अस्मिता व ज्वलंत हिंदुत्वाची ज्योत जागवणारे हिंदुस्थानचे महानेते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी अवघ्या देशाने त्यांचे पुण्यस्मरण केले. शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून शिवसैनिकांची रीघ लागली होती. शिवसेनाप्रमुखांच्या दिव्यत्वाची प्रचिती लाभलेले लाखो ‘कर’ आज शिवतीर्थावर जुळले. नव्या पिढीतील शिवसैनिकांबरोबरच वयोवृद्ध शिवसैनिक नातवंडांसह बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी आले होते. गर्दीचा हा ओघ रात्री उशिरापर्यंत कायम होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्मृतिस्थळावर चाफ्याची फुले वाहून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही स्मृतिस्थळी नतमस्तक होत मानवंदना दिली.
वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम असलेल्या शिवसेनाप्रमुखांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने लाखो लोकांना आपलेसे केले. ‘शिवसेना’ हा चार अक्षरी मंत्र देऊन अनेक आयुष्ये उभी केली. बाळासाहेब हे या सगळ्यांचे दैवत. या दैवतावर असलेली शिवसैनिकांची निस्सीम श्रद्धा आणि प्रेमाची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. कार्यालयीन कामकाजाचा पहिला दिवस असूनही शिवसेनाप्रेमी जनतेने शिवतीर्थावर मोठी गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या लाडक्या नेत्याचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. अनेक शिवसैनिकांनी सहकुटुंब स्मृतिस्थळावर येऊन दर्शन घेत कृतज्ञता व्यक्त केली. महिलांनी भगव्या साडय़ा, पुरुषांनी गळ्यात भगवे उपरणे परिधान केल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. ज्येष्ठ शिवसैनिकांनी यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिक, कार्यकर्त्यांच्या छातीवर शिवसेना आणि बाळासाहेबांचे फोटो, मशाल चिन्ह असलेले बॅच अभिमानाने झळकत होते. अखंड तेवत्या तेजस्वी ज्योतीच्या साक्षीने स्मृतीस्थळ गजबजले होते.
शिवतीर्थ भगवेमय, सर्वत्र चाफ्याचा दरवळ
शिवतीर्थावर ठिकठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शिवतीर्थ परिसर भगवामय झाला होता. तसेच पालिकेच्या माध्यमातून शक्तीस्थळावर फुलांची आकर्षक सजावट करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ त्यांच्या आवडत्या सोनचाफ्याच्या फुलांनी सजवले होते. पांढऱ्याशुभ्र फुलांनी कमान तर झेंडूंच्या फुलांनी संरक्षक लोखंडी गेट सजवण्यात आले होते. त्यामुळे परिसरात मनमोहक दरवळ पसरला होता.
शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राजन विचारे, आमदार अनिल परब, सुनील प्रभू, अंबादास दानवे, उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या सुषमा अंधारे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार महेश सावंत, बाळा नर, हारून खान, वरुण सरदेसाई, सचिव सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे, सुधीर साळवी, प्रकाश फातर्फेकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, केदार दिघे, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आदींनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर पुष्पार्पण करून दर्शन घेतले.
शिवसैनिकांनी जपले सेवेचे व्रत
लाखो शिवसैनिकांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. याचवेळी शेकडो शिवसैनिकांनी ठिकठिकाणी मदतीसाठी उभे राहून सेवाभाव जोपासला. भर उन्हातून हजेरी लावलेल्या शिवसैनिकांना पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. माहीम-वडाळा-धारावी विधानसभा विभाग क्र. 10, बेस्ट कामगार सेना, महाराष्ट्रातील निष्ठावंत शिवसैनिक सदस्य असलेला, ‘आम्हाला गर्व हिंदुत्वाचा’ व्हॉट्सअप ग्रुप, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष आदींतर्फे केळुस्कर मार्गावर शिवसैनिकांसाठी अल्पोपहार आणि पाणी वाटप करण्यात आले.
शरद पवार, अमित शहांसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले. ‘राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात नेहमीच एखाद्या मजबूत ढालीसारखे उभे राहणाऱ्या बाळासाहेबांनी आयुष्यभर संस्कृती आणि स्वधर्माच्या रक्षणासाठी संघर्ष केला. प्रत्येक राष्ट्रप्रेमीसाठी ते मूल्यधारित राजकीय आयुष्याची प्रेरणा आहेत, अशी पोस्ट शहा यांनी केली.
शरद पवार यांनीही बाळासाहेबांचा पह्टो पोस्ट करत त्यांना अभिवादन केले. ‘बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी बाण्याने आणि मुक्तहस्ते विरोधकांवर शब्दांचा मारा केला. त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकांना घायाळ केलं. पण आयुष्यभर त्यांनी राजकारणापलीकडे निःस्वार्थपणे मैत्री जपली; त्यात कटुता आणली नाही. महाराष्ट्राचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे राज्याच्या समाजकारणात मोठे योगदान देणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन, असे शरद पवार म्हणाले.
‘बाळासाहेब हे लोकनेते व हिंदुत्वाचा ओजस्वी स्वर होते. त्यांनी राजकारणाला राष्ट्रकारणाचे आणि जनसेवेला जनकल्याणाचे माध्यम बनवले. त्यांचे संपूर्ण जीवन धाडस, स्पष्टवत्तेपणा आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचे प्रतीक होते, असे ट्वीट योगी आदित्यनाथ यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ पोस्ट करून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.
ठाकरे बंधू एकाच वेळी स्मृतिस्थळी
शिवसेनाप्रमुखांचा आजचा स्मृतिदिन शिवसेनाप्रेमींसाठी खास ठरला. शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर आले होते. ते तिथे असतानाच राज ठाकरेही तिथे पोहचले. दोघांनी शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीला चाफ्याची फुले वाहून अभिवादन केले. त्यानंतर काही वेळ दोघे एकत्र होते. यावेळी त्यांच्यात चर्चाही झाली. दोन्ही नेत्यांनी तिथे उपस्थित शिवसैनिकांचीही विचारपूस केली. हा क्षण सर्वांनाच भावुक करणारा ठरला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List