बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं, राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू अस्मिता जागी केली असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. तसेच बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं असेही राज ठाकरे म्हणाले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृतिदिन. या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
यावेळी सोशल मीडियावर पोस्ट लिहून राज ठाकरे ठाकरे म्हणाले की, शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.
पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !
फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन ! असे राज ठाकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List