बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! एनडीएला पुन्हा पाशवी बहुमत!! जनमत आणि मतमोजणीत तफावत! गडबडीचा संशय!!

बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! एनडीएला पुन्हा पाशवी बहुमत!! जनमत आणि मतमोजणीत तफावत! गडबडीचा संशय!!

केंद्रातील सत्ताधारी भाजपचा केंद्रीय निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून निवडणुका जिंकण्याचा महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये दिसून आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मतचोरी करणाऱया भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 243 पैकी 202 जागांवर पाशवी बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढणाऱया महाआघाडीला फक्त 35 जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत सर्व अंदाज फोल ठरवत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना मोठे यश मिळाले असले तरी जनमत आणि मतमोजणीतील तफावत यामुळे निवडणूक निकालाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

पोटनिवडणुकीत भाजपला झटका

जम्मू-कश्मीर, राजस्थान, पंजाब, ओडिशा, झारखंड, मिजोरम आणि तेलंगणा या राज्यांतील 8 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला केवळ 2 जागा जिंकता आल्या. तेलंगणा आणि राजस्थानमध्ये कॉँग्रेसने बाजी मारली. पंजाबमध्ये आप, जम्मू-कश्मीरातील बडगाम येथे पीडीपीचा विजय झाला. झारखंडमध्ये झामूमोने बाजी मारली. मिजोरममध्ये मिजो नॅशनल फ्रंटचा उमेदवार जिंकला. जम्मू-कश्मीरमधील एक जागा आणि ओडिशा येथे भाजप उमेदवार जिंकला.

एनडीएने बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे जाहीर न करता जेडीयू नेते मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणुका लढविल्या, तर विरोधी पक्षात असणाऱया आरजेडी, कॉँग्रेस महाआघाडीने मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा केली होती. विरोधकांची एकजूट आणि निवडणुकीआधीचे बिहारमधील वातावरण पाहता सत्ताविरोधी लाटेचा फायदा महाआघाडीला होईल असे चित्र सर्वत्र होते; पण भाजप आणि मित्र पक्षांच्या प्रलोभनी घोषणांना भुलून बिहारच्या जनतेने एनडीएच्या पारडय़ात भरभरून मतदान केले. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचा फारसा प्रभाव निवडणुकीत दिसून आला नाही. जनसुराज्यमुळे एनडीला फायदा, तर महाआघाडीला मोठा फटका बसल्याचे एकंदर दिसत आहे.

2020 च्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला काठावरचे बहुमत होते. बहुमतासाठी 122 जागांच्या मॅजिक फिगरची गरज आहे. एनडीएला 125 जागा मिळाल्या होत्या. यावेळी ही संख्या 202 जागांपर्यंत गेली आहे. गेल्यावेळी भाजपला 74 जागा होत्या. यावेळी 89 आहेत. जदयुला 42 होत्या. यावेळी तब्बल 85 जागा मिळाल्या आहेत. बिहार सरकारच्या 29 पैकी 28 मंत्री विजयी झाले. मात्र एकमेव मंत्री जदयूचे सुमित सिंह हे चकाई येथून पराभूत झाले.

मोदींचा हनुमान चिराग कामी आला

चिराग पासवान यांच्या एलजेपीने (आर) 2020च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे 135 जागा लढवल्या होत्या. त्या वेळी जेडीयूच्या सर्व 115 उमेदवारांच्या विरोधात चिराग पासवान यांनी उमेदवार दिले होते. याचा मोठा फटका जेडीयूला बसला होता. स्वतःला पंतप्रधान मोदींचा हुनुमान असे संबोधणाऱया चिराग यांनी 2025मध्ये एनडीएसोबत निवडणूक लढवली याचा मोठा फायदा एनडीएला झाला. मागील वेळी गमावलेल्या 34 पैकी 21 जागा जेडीयूला जिंकता आल्या. भाजपला 8 जागांचा फायदा झाला, तर चिराग पासवान यांच्या पक्षाला 19 जागा जिंकता आल्या. मोदींचा हनुमान एनडीएच्या कामी आला.

3 लाख मतदार कसे वाढले?

माकप (एमएल) लिबरेशन पक्षाचे सरचिटणीस दिपांकर भट्टाचार्य यांनी निकालावरून जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, निकाल नैसर्गिक नाहीत. बिहारमधील जमिनीवरील वास्तवाला धरूनही नाहीत. एसआयआरनंतर बिहारमध्ये 7.42 कोटी मतदार होते. मात्र आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार हा आकडा 7.45 कोटींवर जातो. हे जास्तीचे 3 लाख मतदार कुठून आले, हे निवडणूक आयोग सांगणार का, असा सवाल भट्टाचार्य यांनी केला. .

साहनी यांच्या पक्षाचा दारूण पराभव

महाआघाडीने उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून व्हीआयपीच्या मुकेश साहनी यांना प्रोजेक्ट केले होते. त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत 15 पैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही.

ज्ञानेशकुमार यांना नेपाळला पाठवा!  कामराने घेतली फिरकी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना नेपाळला पाठवा. तिथेही भाजपचे सरकार स्थापन होईल, असा टोला लगावत भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाशी संगनमत करून निवडणूक जिंकत असल्याबद्दल टीका केली आहे.

निवडणूक हायजॅक – संजय सिंह

बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी ‘एसआयआर’ सर्वेक्षण करण्यात आले. लाखो मतदारांची नवे वगळण्यात आली. हे सर्व भाजप आणि निवडणूक आयोगाचे कारस्थान असून निकालात ते दिसून आले. ही निवडणूक हायजॅक झालेली आहे. त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे अभिनंदन, अशी टीका आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केली.

एनडीएने एकता दाखविली – नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल मतदार तसेच एनडीएतील सर्व घटक पक्षांचे आभार मानले. या निवडणुकीत एनडीएने पूर्ण एकता दाखविली आणि मोठा विजय मिळविला. या विजयाबद्दल एनडीएतील सहकाऱयांचे आभार! बिहार आणखी प्रगती करेल आणि सर्वात विकसित राज्यांच्या श्रेणीत समाविष्ट होईल, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.

‘एसआयआर’ने गेम केला, यूपीत होऊ देणार नाही – अखिलेश

बिहारमध्ये ‘एसआयआर’ने गेम केला आहे. तोच गेम पश्चिम बंगाल, तामीळनाडू, यूपी आणि इतर ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आहे. मात्र, हा डाव उघडकीस आला असून आम्ही हा गेम यापुढे खेळू देणार नाही, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे.

बिहारने बनविला बंगाल विजयाचा मार्ग – पंतप्रधान मोदी

भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीचा जल्लोष दिल्लीत साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या मुख्यालयात भाषण करून बिहारच्या मतदारांचे आभार मानले. त्याच वेळी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा वेध घेणारे वक्तव्य केले. गंगा नदी बिहारमधूनच बंगालमध्ये जाते. बिहारने बंगालमधील विजयासाठी मार्ग बनविला आहे. भाजप तुमच्या साथीने पश्चिम बंगालमधील जंगलराज उखाडून फेकेल, असे मोदी म्हणाले. कॉंग्रेस आता मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस बनली असून येत्या काळात कॉंग्रेसचे विभाजन होऊ शकते, असा दावा मोदी यांनी या वेळी केला.

…म्हणून मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर केले नाही – विनोद तावडे

बिहारमध्ये एनडीएकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव जाहीर केले नव्हते. भाजपचे सरचिटणीस व बिहारचे प्रभारी विनोद तावडे म्हणाले की, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सर्व घटक पक्षांची बैठक होईल आणि केंद्रीय नेतृत्त्व निर्णय घेईल. आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. एनडीएमध्ये मुख्यमंत्रीपदाची व्हॅकन्सी नाही, असे अमित शाह यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे कोणाचे नाव जाहीर करण्याची गरज नव्हती, असे तावडे म्हणाले.

निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात – संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. हा एकदम महाराष्ट्र पॅटर्न आहे. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना 50च्या आत संपविले, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.

भाजप – 96 लाख मते – 89 जागा

राजद – 1.8 कोटी मते – 25 जागा!

राष्ट्रीय जनता दलाला भाजपपेक्षा 2 टक्के अधिक मते मिळाली. राजदला 22.92 टक्के मतदान झाले आहे, तर भाजपला 20.14 टक्के मतदान झाले आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयूला 19.24 टक्के मतदान झाले आहे. त्याबाबत तेजस्वी यादव यांनी एक्स पोस्ट केली. 1.8 कोटी मते घेणाऱ्या राजदला 25 जागा, 96 लाख मते घेणाऱया भाजपला 89 जागा, 90 लाख मते घेणाऱया जदयुला 83 जागा, असे नमूद करत जनता आमच्या सोबत असल्याचे ते म्हणाले.

प्रशांत किशोर निष्प्रभ; नोटापेक्षाही कमी मते

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वतःचा जन सुराज्य पक्ष निवडणुकीत उतरवला होता. त्यांनी 238 जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. मतदानाची टक्केवारी पाहता या पक्षाला ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली.

भाजपने आता अमेरिकेतही लढावे!

बिहारच्या निकालाने धक्का बसलेला नाही. मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो, हा त्यांचा विजय आहे. भाजपने आता अमेरिकेतही निवडणूक लढवावी. मतदानाचा अधिकार काढून टाकल्यावर काय होते हे आज दिसले, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

हे प्रमुख चेहरे विजयी

  • तेजस्वी यादव (विरोधी पक्षनेते)
  • सम्राट चौधरी (उपमुख्यमंत्री)
  • विजय सिन्हा (उपमुख्यमंत्री)
  • शंभुनाथ यादव (राजद)
  • आनंद मिश्रा (माजी आपीएस)
  • मैथिली ठाकूर (भाजप)

या दिग्गजांचा पराभव

  • तेजप्रताप यादव (जजद)
  • राजेश राम (कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष)
  • डॉ. शकील अहमद खान (कॉँग्रेस विधिमंडळ नेते)
  • खेसारीलाल यादव (राजद, भोजपुरी सुपरस्टार)
  • रितेश पांडये (जन सुराज्य, भोजपुरी सिंगर)
  • शिवदीप लांडे (माजी आयपीएस अधिकारी)

नितीशकुमार मुख्यमंत्री…जदयुचा दावा आणि पोस्ट डिलीट

मुख्यमंत्री कोण होणार? नितीशकुमार कायम राहणार की भाजपचा मुख्यमंत्री होणार? यावरून सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळल्या असल्या तरी नितीशकुमार यांच्या जदयुने मोठी मुसंडी मारली आहे. 20 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असा दावा जदयुचे नेते करत आहेत. त्यातच जदयुने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर ‘न भूतो न भविष्यति… नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री होते आणि राहतील’ अशी पोस्ट केली. या पोस्टमुळे एनडीएमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर काही वेळात जदयुने ही पोस्ट डिलीट केली आहे.

हा तर ज्ञानादेश!

या निवडणुका निपक्ष झाल्या असे आपल्याला वाटते का? असा प्रश्न जनतेला विचारत हा जनादेश नाही, ज्ञानादेश आहे, असा सणसणीत टोला तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना लगावला. जनतेचा फैसला आम्हाला मान्य आहे. आमचा संघर्ष सुरूच राहील, असे ते म्हणाले.

पक्षपात झाला

हे निकाल धक्कादायक आहेत. निवडणुकीत पक्षपात झाला. मात्र आमचा लढा संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. इंडिया आघाडी या निकालावर मंथन करेल, अशी प्रतिक्रिया लोसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली.

तेजस्वी पिछाडीनंतर झाले विजयी

राजदचे नेते व महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे राघोपूर येथून सुरुवातीला पिछाडीवर होते. मात्र अखेरच्या काही फेऱयांमध्ये त्यांनी मोठी मुसंडी मारत विजय मिळविला. त्यांनी भाजपचे सतीशकुमार यांचा 14 हजार 532 मतांनी पराभव केला. तेजस्वी यांना 1 लाख 18 हजार 597 मते मिळाली.

  • बीजेपी 89
  • जदयु 85
  • लोजपा 19
  • हम 05
  • रालोमो 04
  • महाआघाडी 35
  • राजद 25
  • काँग्रेस 06
  • व्हीआयपी 00
  • डावे 03
  • आयआयपी 01
  • अन्य 06
  • एमआयएम 05
  • बसपा 01
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जैन बोर्डिंगचे खरेदीखत अखेर न्यायालयात रद्द जैन बोर्डिंगचे खरेदीखत अखेर न्यायालयात रद्द
शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व्यवहारातील खरेदी खत अखेर कायदेशीररीत्या रद्द करण्यास पुणे दिवाणी न्यायालयात शिक्कामोर्तब झाले. दि. 8...
असं झालं तर… गाडीचा ब्रेक फेल झाला तर…
शास्त्रज्ञाची लेक ते आघाडीची अभिनेत्री
ज्येष्ठ पर्यावरणवादी, ’पद्मश्री’ थिम्मक्का यांचे निधन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात बेवारस लाल बॅगमुळे घबराट, पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाची धावाधाव
प्रशांत दामले @13,333! विक्रमी प्रयोगानिमित्त 21 नोव्हेंबरला विलेपार्ल्यात होणार भव्य सत्कार
धर्मेंद्र यांचा आयसीयूतील व्हिडीओ लीक करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक