SA20 – ग्रॅमी स्मिथ म्हणाला, टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल शत्रू; बुमराहबाबतही मोठं विधान
जगभरामध्ये सध्या लीग क्रिकेटची धमाल सुरू आहे. आगामी वर्षी हिंदुस्थानात आयपीएलच्या नवीन हंगामाची सुरुवात होईल. तत्पूर्वी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये एसए-20 लीग स्पर्धा होणार आहे. 26 डिसेंबर 2025 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान चौथा हंगाम रंगणार आहे. याच निमित्ताने दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू मुंबईत एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. यावेळी माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कसोटी मालिकेवरही भाष्य केले.
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात शुक्रवारपासून पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. या लढतीमध्ये फिरकीपटूंना सामोरे जाण्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जसप्रीत बुमराह याच्या घातक स्पेलचा सामना करण्यासाठी तोडगा शोधावा लागेल, असे स्मिथ म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही याची तयारी केली असेल. पहिल्या तीन फलंदाजांवर चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी असणार आहे. फिरकीपटू येण्याआधी वेगवान गोलंदाजांना दोन-तीन विकेट्स दिल्यास संघ बॅकफूटवर जाऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेसाठी बुमराह, तर हिंदुस्थानसाठी रबाडाचा स्पेल खेळणे आव्हानात्मक असणार आहे. दोघेही सर्वोत्कृष्ट गोलंदाज असून त्यांची कसोटीतील कामगिरी याची ग्वाही देते, असेही स्मिथ यावेळी म्हणाला.
जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे 12 वाजणार, पुढील हंगामापासून 12 कसोटी संघांना सामावून घेण्याचा प्रस्ताव
दक्षिण आफ्रिकेचा संघही वेगवान गोलंदाजांसह फिरकीचा ताफा घेऊन आला आहे. महाजार आणि हार्मर विरोधी संघाला दबावात आणू शकतात. ते खेळावर नियंत्रण मिळवू शकतात आणि ते चेंडू फिरवण्यात माहीर आहेत. यामुळे विकेट घेण्याचा पर्याय मिळतो, असे स्मिथ म्हणाला. यावेळी त्याने त्याच्या संघातील माजी सहकारी आणि टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल याच्यावरही मजेशीर टिप्पणी केली. मॉर्ने मॉर्केल शत्रू असून तो चुकीच्या संघात आहे, असे स्मिथ मजेशीर अंदाजात म्हणाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List