‘डोमेस्टिक क्रिकेट खेळा’ BCCI चा विराट कोहली आणि रोहित शर्माला सल्ला; रोहितने भूमिका केली स्पष्ट
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधील भवितव्याबद्दल चर्चा सुरू असतानाच, हिंदुस्थानच्या क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कथितरित्या या अनुभवी खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालेले रोहित आणि कोहली हे आता फक्त एकदिवसीय फॉर्मेटमधील खेळाडू आहेत. त्यामुळे, त्यांच्या निवडीसाठी फिटनेस हा महत्त्वाचा विषय बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवडण्यापूर्वी, या दोघांनी विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळण्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार, रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) कळवले आहे की, तो विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी उपलब्ध असेल. याउलट, कोहलीने मात्र डोमेस्टीक क्रिकेटसाठी आपल्या उपलब्धतेबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
बीसीसीआयच्या सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ‘बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने या दोघांनाही स्पष्ट केले आहे की, जर त्यांना हिंदुस्थानसाठी खेळायचे असेल, तर त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. कारण त्यांनी दोन फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे मॅच फिट राहण्यासाठी त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक आहे’.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत हिंदुस्थानने खराब कामगिरी केल्यानंतर बीसीसीआयने असाच निर्देश दिला होता, तेव्हा कोहली आणि रोहित दोघांनीही रणजी करंडक स्पर्धेत प्रत्येकी एका सामन्यात सहभाग घेतला होता.
त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वी या दोघांनी निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी, जर त्यांना २०२७ च्या एकदिवसीय वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धेत उतरायचे असेल, तर त्यांच्याकडून तशाच उपलब्धतेची अपेक्षा केली जात आहे.
बीसीसीआय निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर याने राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळणे किती महत्त्वाचे आहे, यावर जोर दिला होता.
तो म्हणाला होता की, ‘आम्ही एक किंवा दोन वर्षांपूर्वीच हे स्पष्ट केले होते की, जेव्हा खेळाडू उपलब्ध असतील, तेव्हा त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे. जर तुम्ही मोठी विश्रांती घेत असाल तर स्वतःला फीट ठेवण्यासाठी क्रिकेट खेळत ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना हे शक्य होईल की नाही, हे वेळच सांगेल, परंतु जर खेळाडूंकडे वेळ असेल तर त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे.’
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर या दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात पुनरागमन केले होते. त्या मालिकेत रोहितने एक अर्धशतक आणि एक शतक झळकावून ‘सामनावीर’चा पुरस्कार मिळवला होता. दुसरीकडे, कोहलीने फक्त मालिकेतील शेवटच्या सामन्यात ७४ धावांची खेळी करून आपली क्षमता दाखवली होती.
दरम्यान, विजय हजारे करंडक स्पर्धा २०२५-२६ २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List