मिठागराची 104 एकर जमीन मीरा-भाईंदर महापालिकेला मिळणार
मिठागराची १०४ एकर जमीन लवकरच मीरा-भाईंदर महापालिकेला मिळणार आहे. त्यास केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने मंजुरी दिली असून हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शहरातील विविध विकासकामांना गती मिळेल. त्यात रस्ते, मैदाने, स्टेडियम तसेच उड्डाणपुलाचा समावेश आहे. पालिकेला प्रशस्त जागा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना जास्तीत जास्त सुविध देता येतील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
मीरा-भाईंदर पालिका प्रशासनाने मिठागराच्या जमिनीवर विविध आरक्षणे टाकली होती. त्यासाठी जमीन ताब्यात मिळावी म्हणून पालिकेने पाठपुरावा केला. यासंदर्भात मिठागर विभाग व पालिकेच्या अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठकही पार पडली. ही बैठक सकारात्मक झाली असून रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी चालना मिळेल असे मीरा-भाईंदर पालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा व शहर अभियंता दीपक खांबीत यांनी सांगितले.
मिठागर विभागाच्या जागेवर नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाच्या स्टेडियमचे आरक्षण टाकण्यात आलेले आहे. हि जागा १ लाख ८० हजार चौरस मीटर इतकी आहे.
बोस मैदान ते मोर्वा गावादरम्यान ३० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित असून त्याचे क्षेत्र २७ हजार १८० चौरस मीटर इतके आहे.
मिरारोड पूर्वेकडील ३२ हजार ७५८ चौरस मीटर जागेवर ३० मीटर रेल्वे समांतर रस्त्याचे आरक्षण आहे. मिरारोड पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपूलाचे आरक्षण प्रस्तावित आहे. भाईदर पश्चिमेला रुंद रस्त्याचे व मलनिस्सारण केंद्राचे आरक्षण आहे.
२५ कोटी ९१ लाख मोजावे लागणार
एकूण ४ लाख १८ हजार ७४५ चौरस मीटर क्षेत्र मिठागर विभागाच्या अखत्यारीत या जमिनीच्या बदल्यात रेडीरेकनर किमतीच्या दहा टक्के आर्थिक मोबदला मिठागर विभागाला दिला जाणार आहे. या जागेसाठी २५ कोटी ९१ लाख १४ हजार ४७३ रुपये पालिकेला द्यावे लागतील, अशी माहिती देण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List