सांगली शहरात दोन गटांत धुमश्चक्री; 15 जण ताब्यात, मंगळवार रात्रीच्या घटनेनंतर पोलिसांची कारवाई
मिरजेत मंगळवारी रात्री दोन गटांत झालेल्या वादानंतर पोलिसांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली आहे. तसेच बेकायदा जमाव जमल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेत 35 जण निष्पन्न झाले असून, 15 जणांना ताब्यात घेतले आहे. शांतता समितीची बैठक घेऊन अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अफवा पसरवणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
मिरजेत दोन मित्रांमध्ये मंगळवारी शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून दोन गट समोरासमोर आले. पोलीस ठाण्यासमोर बेकायदा जमाव जमला होता. याप्रकरणात पोलिसांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱयांवर कारवाई केली आहे. तसेच बेकायदा जमाव जमवून जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी 35 संशयित आरोपी निष्पन्न केले असून, 15 जणांना ताब्यात घेतले आहे.
मिरजेतील वादानंतर सर्वत्र वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मिरजेतील आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह प्रशासन अधिकारी, शांतता कमिटी, प्रतिष्ठत नागरिक, समाजसेवक यांची बैठक घेतली. या बैठकीत शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले होते.
अधीक्षक घुगे म्हणाले, मिरजेत दोन गटांत झालेल्या वादानंतर अनेकांना नेमकी घटना माहीत नव्हती. अर्धवट माहितीच्या आधारे अनेकजण एकत्र आले होते. त्यांनी बेकायदा जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. वादावादीनंतर गाडय़ांची तोडफोड झाल्याची कोणतीही माहिती पोलिसांपर्यंत आली नाही. एक फलक तोडण्यात आला. कोणत्याही फलकावर धार्मिक नोंद नव्हती. त्यामुळे या प्रकरणावरून कोणतीही अफवा पसरू नये; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता कमिटीसह सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी अपर अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक विमला एम., उपअधीक्षक प्रणील गिल्डा आदी उपस्थित होते.
फलकाबाबत पोलिसांची परवानगी हवी
डिजिटल फलक उभारताना पोलीस दलाचा ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आवश्यक करावे, यासाठी महापालिका प्रशासनाला पत्र दिलेले आहे. वादग्रस्त फलक उभारले जाणार नाहीत, विद्रूपीकरण होणार नाही यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाईल. त्यासाठी समन्वय ठेवला जाईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List