काशी विश्वनाथाच्या पुजाऱ्यांवर भोलनाथ प्रसन्न; मिळणार 200 टक्के पगारवाढ
उत्तर प्रदेश सरकारने श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या पुजारी आणि तेथील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पुजारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नवीन सेवा नियमांना मंजुरी दिली आहे. या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे. पुजाऱ्यांना आतापर्यंत 30 हजार मासिक वेतन मिळत होते, त्यात आता नव्या नियमांनुसार तिप्पट वाढ होणार आहे.
श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने नुकत्याच झालेल्या 108 व्या बैठकीत अनेक प्रस्ताव मान्य केले आहेत. यापैकीच एक म्हणजे पुजारी आणि कर्मचाऱ्यांची वेतनवाढ. 1983 मध्ये सरकारने मंदिर प्रशासन ताब्यात घेतल्यापासून कोणतेही बदल झाले नव्हते. मात्र आता घेतलेल्या निर्णयानुसार त्य़ांना पगारवाढ मिळणार आहे. या बदलामुळे मंदिर कर्मचाऱ्यांना उत्तर प्रदेशातील इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने इतर फायदे मिळतील.
दरम्यान, वेतनवाढीसोबतच भाविकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी काशी विश्वनाथ धाम आणि शक्तीपीठ विशालाक्षी माता मंदिर दरम्यान थेट मार्ग तयार करण्यासाठी इमारती खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्व भूषण मिश्रा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली. मंदिराच्या पुजाऱ्यांना पूर्वी कोणतेही सेवा नियम नव्हते. आता नियमांसह कराराला ट्रस्टने मान्यता दिली आहे. जर सरकारने सहमती दर्शवली, तर जे पुजारी हे स्वीकारून यावर स्वाक्षरी करतील त्यांना सुधारित सेवा आणि लाभ मिळतील, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List