नाम फाउंडेशन चिपळूणमध्ये पुन्हा गाळमुक्त अभियान राबवणार; नाना पाटेकर यांची माहिती
चिपळूणमधील २०२१ च्या महापुरानंतर चिपळूण बचाव समितीने शहराच्या पूर व्यवस्थापनासाठी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे प्रशासनाने वाशिष्ठी आणि शिवनदीमध्ये गाळ काढण्यासाठी मोठी यंत्रणा पाठवली. त्यासोबतच, नाम फाउंडेशनच्या वतीने गाळमुक्त अभियान राबवण्यासाठी दुसरी यंत्रणा चिपळूणमध्ये पाठवण्यात आली होती.
या अभियानाच्या माध्यमातून वाशिष्ठी आणि शिवनदीचे पात्र रुंद आणि खोल करण्यात आले. परिणामी २०२१ नंतर सलग तीन वर्ष चिपळूणमध्ये पुराचे पाणी शिरले नाही. मात्र यंदा उशिरा आणि अतिमुसळधार पावसामुळे शहरात वाशिष्ठीचे पाणी शिरले, तरी प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे पातळी वाढली नाही. काही ठिकाणी अजून अधिक काम करण्याची गरज आहे.
चिपळूण बचाव समिती आणि प्रशासनाच्या विनंतीनुसार नाम फाउंडेशन पुन्हा चिपळूणमध्ये गाळमुक्त अभियान राबवणार आहे. अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी “आपण सर्वांनी मिळून चिपळूणमध्ये अधिक काम करूया,” असे आवाहन केले. या संदर्भात नाम फाउंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर, समन्वयक महेंद्र कासेकर आणि देशपांडे यांनी नाना पाटेकर यांची शुक्रवारी पुण्यात भेट घेतली. सध्या पावसाचा जोर असल्याने, सप्टेंबरनंतर पावसाचे थांबलेल्यानंतर या अभियानाची बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. गाळाचे नियोजन चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले आणि चिपळूण बचाव समितीच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे.
याशिवाय, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी नाना पाटेकर यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी गाळ काढण्यासंदर्भात नियोजनपूर्व चर्चा करण्याची मागणी केली. तसेच, चिपळूणसोबतच संगमेश्वरमधील नद्यांमध्येही गाळमुक्त अभियान राबवण्याची विनंती केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List