Asia Cup 2025 – रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही… पाकिस्तानविरुद्ध खेळण्यावरून हरभजन सिंगने सुनावले खडे बोल
Asia Cup 2025 ला 9 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. परंतु या आशियाई चषकाची चर्चा हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यामुळे आतापासून सुरू झाली आहे. पहलगाम हल्ल्यापासून दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळेच वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्समध्ये हिंदुस्थानच्या संघाने सेमी फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देत स्पर्धेतून माघार घेतली होती. परंतु आता आशियाई चषकामध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होणार असल्याने माजी खेळाडू हरभजन सिंगने नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले आहेत.
हरभजन सिंगने TOI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली भुमिका स्पष्ट केली आहे. तो म्हणाला की, “त्यांना काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही हे समजले पाहिजे. माझ्यासाठी सीमेवर उभा असलेला आणि कधीकधी घरी जाऊ न शकलेला जवान जास्त महत्त्वाचा आहे. ते देशासाठी आपले जीवन अर्पण करतात. त्यांचे बलिदान आपल्या सर्वांसाठी खूप मोठे आहे. आपण एक क्रिकेटचा सामना चुकवू शकत नाही का? त्यांच्या तुलनेत ही खूप छोटी गोष्ट आहे. सीमेवर तणाव आहे आणि आपण त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणं, हे शक्य नाही. जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत क्रिकेट खेळू नये. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.” असं म्हणत त्याने हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्या संदर्भातली आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
युएईमध्ये आशियाई चषकाला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील हिंदुस्थान-पाकिस्तान सामना 14 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर सूपर-4 मध्ये दोन्ही संघा एकमेकांना भीडतील. तसेच जर दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले तर पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होईल. त्यामुळे तीन वेळा हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता टीम इंडियाचे खेळाडू काय निर्णय घेणार हे पुढील काही दिवसांमध्ये समोर येईलच.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List