अहिल्यानगरमधील रस्त्याच्या कामातील महाघोटाळा प्रकरण; मनपा आयुक्त यशवंत डांगेंवर गुन्हा दाखल करा, किरण काळे यांची मागणी
महापालिका क्षेत्रातील 776 रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे 350 ते 400 कोटींच्या महाघोटाळ्याबाबत आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेला खुलासा पाहता ते महापालिकेचे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱयांचे प्रवत्ते, असा सवाल करीत यांच्या हाती आयुक्त म्हणून आम्ही शहर सोपवलंय. मात्र, हे भ्रष्टाचाऱयांना पाठीशी घालण्यात व्यग्र आहेत, अशा आयुक्तांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, तसेच त्यांच्यावर हक्कभंगसुद्धा आणला पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
यावेळी गौरव ढोणे, विलास उबाळे, महावीर मुथा, किशोर कोतकर, अनिस चुडीवाला, आकाश आल्हाट उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले, ‘स्वतः आमदारांनी सांगितले आहे की, निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या कामाशी त्यांचा थेट संबंध असल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे. सर्व ठेकेदार हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत. जनतेच्या तिजोरीतील निधी हे मंत्रालयातून आणतात. मनपात जनता कर भरून कोटय़वधी रुपये जमा करते. यातून गरजेपेक्षा अधिक वाढीव रकमांचे इस्टिमेट राजकीय दबावातून अधिकाऱयांशी संगनमत करून तयार करून घेतले जातात. या सगळ्यांमध्ये 10 ते 40 पर्यंतची टक्केवारी आमदार आधीच जमा करून घेतात. कारण ते खोक्यांच्या सरकारचे आमदार आहेत. त्यांच्या वरदहस्ताशिवाय एवढा मोठा स्कॅम होऊच शकत नाही’, असा हल्लाबोल काळे यांनी केला.
आयुक्त डांगे यांचा समाचार घेताना काळे म्हणाले, ‘आयुक्त डांगे यांनी भ्रष्टाचाऱयांची, आमदारांची प्रवक्तेगिरी सुरू केली आहे. शहराची कामे करण्यापेक्षा कलेक्शन एजंट असणारे राजकीय हस्तक, ठेकेदार यांच्याबरोबर अँटी चेंबरमध्येच त्यांचा सगळा वेळ जातो. भ्रष्टाचाऱयांचा तो अड्डा झाला आहे. एवढं सगळं सुरू असताना आयुक्त म्हणतात की, अशी कोणतीही तक्रारच आलेली नाही. घोटाळा झालेला नाही. तसेच शासकीय तंत्रनिकेतनचे टेस्ट रिपोर्ट बनावट असल्याबाबत मनपाकडे कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, तक्रार नाही, असे आयुक्त म्हणातात. मात्र, 30 जून 2023 रोजी शासकीय तंत्रनिकेतनने आयुक्तांना अर्धशासकीय पत्र पाठवत पाच सदस्यांच्या समितीने चौकशीअंती 776 कामांमध्ये शासकीय तंत्रनिकेतनच्या नावाने बनावट टेस्ट रिपोर्ट जोडले असून, पोलीस विभागाने सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याकरिता मनपाच्या ताब्यात असणाऱया गुह्याच्या मूळ प्रतींची मागणी केली होती; पण महानगरपालिकेने ती दिली नाही, त्यामुळे तो गुन्हा दाखल झाला नाही’, असे किरण काळे यांनी सांगितले.
भ्रष्टाचारांना मदत करणे हा देखील भ्रष्टाचार असून, या घोटाळ्यात आयुक्त डांगे यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करा, आरोपी करा, अशी मागणी किरण काळे यांनी केली. आमदार, मनपा अधिकारी, ठेकेदार यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही त्यांनी केली.
आयुक्तांवर हक्कभंग का आणू नये?
कोणताही घोटाळा झालेला नाही, अशी माहिती आयुक्त डांगे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. मुळात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आयुक्तांना नव्हे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्या आरोपांना उत्तर आयुक्तपदासारख्या घटनात्मक प्रशासकीय पदावर असणाऱया व्यक्तीने दिले आहे. कायदेमंडळाच्या देशातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ सदस्यांना अशा प्रकारे राजकीय उत्तर देणाऱया आयुक्तांवर हक्कभंग का आणला जाऊ नये? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.
आयुक्तांनी राजीनामा तरी द्यावा, नाहीतर बदली तरी करून घ्यावी
आयुक्त डांगे हे आयुक्त नव्हे तर राजकीय कार्यकर्त्याप्रमाणे वागत आहेत. राजकारण करायची एवढीच हौस असेल तर त्यांनी कार्यक्षम, भ्रष्ट नसणाऱया, प्रामाणिक अधिकाऱयासाठी महापालिका आयुक्तपदाची खुर्ची खाली करावी, राजीनामा द्यावा. नाहीतर खोके सरकारमध्ये सहभागी असणाऱया राष्ट्रवादीचे घडय़ाळ हातात बांधत मनपाची निवडणूक लढवावी. मात्र, नगरकरांना कुणाच्याही रिमोट कंट्रोलवर वेठीस धरू नये अन्यथा त्यांनी बदली करून घ्यावी, असा खोचक सल्ला काळे यांनी दिला आहे.
हा तर हिंदुत्वाचा अपमान!
विकासकामांमधील भ्रष्टाचार दडविण्यासाठी त्यांची हिंदुत्वाच्या नावाने बनवाबनवी सुरू आहे. भगवा टिळा, भगवी टोपी, भगवा पंचा घालून शहराचे लोकप्रतिनिधी भगवद्गीतेत नैतिकतेने वागण्याच्या दिलेल्या उपदेशाविरुद्ध वागत आहेत. हा भगव्याचा, हिंदुत्वाचा अपमान असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता काळे यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List