TMC खासदार महुआ मोईत्रा लग्नबंधनात अडकल्या, 65 वर्षीय नेत्याशी बांधली साताजन्माची गाठ!
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या लग्नबंधनात अडकल्या आहेत. बिजू जनता दलाचे नेते आणि माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्यासोबत त्यांनी साताजन्माची गाठ बांधली आहे. जर्मनीमध्ये हा विवाहसोहळा पार पडल्याचे वृत्त आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, दोघांकडून अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महुआ मोईत्रा आणि पिनाकी मिश्रा (वय – 65) यांनी जर्मनीमध्ये लग्न केले. 3 मे रोजी काही निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात दोघांनीही पारंपरिक कपडे घातले होते. महुआ यांनी सोनेरी-गुलाबी रंगाची साडी घातली होती, तर पिनाकी यांनी कुर्ता-पायजमा आणि सोनेरी रंगाचे जॅकेट घातले होते.
महुआ यांचे पती पिनाकी हे बिजू जनता दलाकडून चार वेळा खासदार राहिले आहेत. 1996 ला ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. ओडिशातील पुरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. 2024 पर्यंत ते खासदार होते. पिनाकी हे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ विधिज्ञही आहेत. त्यांची जवळजवळ 3 दशकांची दीर्घ राजकीय आणि कायदेशीर कारकीर्द आहे. ते अनेक उच्चस्तरीय समित्यांचे सदस्यही राहिले आहेत.
पिनाकी मिश्रा यांचे पहिले लग्न संगीता मिश्रा यांच्यासोबत झाले होते. 16 जानेवारी 1984 रोजी हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. मिश्रा दाम्पत्याला दोन मुलेही आहेत. परंतु, आता पिनाकी यांनी महुआ मोईत्रा यांच्याशी लग्न केले आहे.
दरम्यान, महुआ मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या खासदार असून 2019 ला त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. पश्चिम बंगालच्या कृष्णानगर मतदारसंघातून त्यांनी भाजपचे उमेदवार कल्याण चौबे यांचा पराभव केला होता. त्यानंतर याच मतदारसंघातून 2024 ला त्यांनी भाजपच्या अमृता रॉय यांचा पराभव केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List