कथा एका चवीची- एक चाय हो जाए?

कथा एका चवीची- एक चाय हो जाए?

>> रश्मी वारंग

त्याला हजार मिनतवाऱया केल्यावर येणारा ‘तो’ आधीच आला. उन्हाने त्रासलेल्या समस्त जनांना त्याने पार चिंब करून टाकलं. म्हणजे उन्हाळ्यातून पावसाळ्यात शरीराने आलो, पण इतक्या लवकर आलेला पाऊस मनाने स्वीकारलेलाच नसताना त्याचं स्वागत करावं तर कसं? या संभ्रमात गोंधळलेल्या जिवांसाठी हुकूमत पर्याय एकच, तो म्हणजे चहा. पाऊस आणि चहा यांचं नातं घट्ट आहे. चाय से करेंगे उसका स्वागत.

भारतात प्रत्येक प्रांतात चहा आहे. पण काही प्रांतांची खासियत औरच. महाराष्ट्र प्रसिद्ध बासुंदी चहापासून सुरुवात करूया. या चहाच्या नावातच सारं काही आहे. बासुंदीसारखा आटीव चहा म्हणजे बासुंदी चहा. या नावाची गंमत कोल्हापूर येथील वाडी रत्नागिरीतील जोतिबा देवस्थानाच्या परिसरात वाचायला मिळाली. तिथल्या एका प्रसिद्ध चहा विक्रेत्यांकडे आई आणि लेक आटीव दुधाचा चहा पित होते. चहा पिऊन झाल्यावर लेकाने कपात बोटं टाकून चहा चाटायला सुरुवात केली आई म्हणाली, ‘ए वेडय़ा, असं बोटांनी चहा चाटायला ती काय बासुंदी आहे का?’ त्या चाणाक्ष चहा विक्रेत्याने तेच नाव उचललं आणि वारणेच्या खोऱयातील धष्टपुष्ट गोधनाच्या आटीव दुधापासून बनवलेला चहा झाला बासुंदी चहा!

यानंतर  नागोरी  चहाकडे वळूया. महाराष्ट्रातील गल्लीबोळात नागोरी चहा ही पाटी वाचल्यावर हा कोणता ब्रँड? अशी शंका येते. पण हा ब्रँड नाही, तर त्या प्रांताची खासियत म्हणता येईल. राजस्थानमधील नागोरी हा प्रांत मुख्यत संगमरवरासाठी प्रसिद्ध. पण याच जमातीमधील अनेकजण पारंपरिक दुग्ध व्यवसाय करतात. राजस्थानमधील नागोरी बैलांची प्रजातीही अतिशय प्रसिद्ध. तर ही नागोरी मंडळी भारतभरात जिथे जिथे पसरली, त्यांनी आपली चहा बनवण्याची खास पद्धत तिथे तिथे नेली. आजही नागोरी चहावाल्याकडे दुग्धजन्य पदार्थ तुम्हाला चहा सोबत दिसतात. कारण हा त्यांचा खानदानी व्यवसाय आहे. या मंडळींचं वैशिष्टय़ असं की, गाईचं ताजं दूध चहासाठी ते वापरतात. त्यामुळे यांचा चहा हा एकदम वेगळा आणि छान लागतो.

एकेकाळी मुंबईवर राज्य गाजवणाऱया इराणी चहाला विसरून कसं चालेल? आज ठिकठिकाणी इराणी चहा प्यायला तरुणाईही गर्दी करते. 19 व्या शतकात भारतात आलेल्या पर्शियन स्थानांतरित मंडळींनी इराणी चहा लोकप्रिय केला. या चहाची खासियत म्हणजे चहापत्ती अलगपणे पाण्यात उकळवली जाते. दूध स्वतंत्रपणे उकळवून घट्ट केलं जातं आणि मग ते चहात ओतलं जातं. दोन्ही एकत्र गरमागरम मिसळले जातात. इतर चहांपेक्षा हा चहा थोडा जास्त घट्ट असतो आणि मुख्य म्हणजे साखर वापरण्यात अजिबात कंजुषी केली जात नाही. या इराणी कॅफेतील चहा आणि बन-मस्क्यासोबत एकेकाळी किती गप्पांच्या मैफली रंगल्या आणि कितीजणांची मैत्रीचे बंध घट्ट जुळले याची गणती नाही.

भारतातील प्रांतोप्रांतीचे चहा मांडत गेलो तर यादी मोठी आहे. पण पुन्हा कधीतरी पाऊस, चहा, तुम्ही आणि मी ही कुंडली घेऊन बसू. आजच्यापुरतं इतकंच चहा पुराण. जाता जाता कुणा चहाप्रेमी सुहास यांनी रचलेलं आणि चहाबाजांना समर्पित केलेलं चहास्तोत्र आठवूया.

चहाविना आप्तस्नेह्यांचे स्वागतासी अपूर्णता ।

यास्तव भूतल जन हे म्हणती यासी अमृता ।

येणारा वर्षा ऋतू गरमागरम चहाच्या वाफांसोबत तरल आणि मधुर जावो याच चिंब शुभेच्छा!

इसी बात पे एक चाय हो जाए?

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;