ठाणे रेल्वे स्थानकात माथेफिरूंचा धिंगाणा; पाच शौचालयांची तोडफोड
ठाणे रेल्वे स्थानकात काही अज्ञात माथेफिरूंनी मध्यरात्री अक्षरशः धिंगाणा घालत शौचालयांची तोडफोड केली. या स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या तब्बल ५ शौचालयांमधील नळ, भांडी, बेसीनसह काचांचा चक्काचूर करून टाकला आहे. शौचालयांची जाणीवपूर्वक तोडफोड करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून रेल्वे प्रशासन सीसीटीव्हीच्या माध्यमातून राडा घालणाऱ्या भामट्यांचा शोध घेत आहे.
ठाणे रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरीय रेल्वेचा एक भाग आहे. दररोज लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. या स्थानकात जवळपास 12 हून अधिक सार्वजनिक प्रसाधनगृहे आहेत. काही अज्ञात तरुणांनी मध्यरात्री शौचालयात प्रवेश केला. यामध्ये 5 शौचालयांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. येथील प्रसाधनगृह पूर्णतः निकामी करण्यात आली असून काही ठिकाणी चेंबर्स बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रसाधनगृहे बंद असल्याने गैरसोय
स्थानकावरील फलाट क्रमांक 1, फलाट क्रमांक 2 (मध्य भाग), फलाट क्रमांक 2 (कल्याण दिशेने), फलाट क्रमांक 10 (मध्य भागी) आणि फलाट क्रमांक 10 (मुंबई दिशेचे) या ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृहांची तोडफोड करण्यात आली असून यामुळे ही प्रसाधनगृहे आता बंद करण्यात आली असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
प्रसाधनगृहांची डागडुजी करण्यात येत आहे. लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी पुन्हा उपलब्ध होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. या घटनेबद्दल कोणाला माहिती असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List