तिजोरीत खडखडाट तरीही घोषणांचा वर्षाव, चौंडी येथे मंत्रिपरिषदेची बैठक; तीर्थक्षेत्रांसाठी 5503 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी
सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याने ‘लाडक्या बहिणीं’ना देण्यासाठी पैसे नाहीत. शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही कर्जमाफी दिलेली नाही. विकासकामे ठप्प आहेत. मात्र, आज चौंडी येथे झालेल्या मंत्रिपरिषदेच्या विशेष बैठकीत घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. विविध तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार आणि विकास करण्यासाठी 5503 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आज राज्य मंत्री परिषदेची विशेष बैठक आयोजित केली होती. जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव आहे. या मंत्री परिषद बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विविध खात्यांचे मंत्री, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्र्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या वाडय़ाला भेट दिली व त्या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरामध्ये पूजा केली. शिल्पसृष्टीची पाहणी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत केली.
अहिल्यानगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
अहिल्यानगर शहरात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यात येईल. त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण नियुक्त केले जाणार आहे. त्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाईल.
मंत्री शंभूराज देसाईंना ऊन सहन होईना
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी शिल्पसृष्टीला भेट दिली. मात्र, मंत्री शंभूराज देसाई हे एका झाडाच्या सावलीत बसले होते. उन्हाची तीव्रता होती. देसाईंना ऊन सहन झाले नाही, असे कारण सांगण्यात आले.
जामखेड एमआयडीसीचा विसर
जिह्यासाठी भरघोस निधी मिळेल, अशी आशा होती. मात्र, जनतेची निराशा झाली. जामखेड एमआयडीसी, कुकडीचे पाणी या महत्त्वाच्या प्रश्नांवर काहीच निर्णय घेतला नाही, याचा विसर सरकारला पडला.
मंत्री परिषदेतील निर्णय
- चौंडीच्या विकासासाठी 681 कोटी रुपयांच्या आराखडय़ाला मंजुरी. या निधीतून चौंडीचे तीर्थक्षेत्र व्हावे, या दृष्टीने विकास होणार.
- राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 5503 कोटींच्या आराखडय़ाला मान्यता. यामध्ये तुळजाभवानी मंदिरासाठी 865 कोटी, जोतिबा देवस्थानसाठी 269 कोटी, त्र्यंबकेश्वर देवस्थानसाठी 275 कोटी, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरासाठी 1485 कोटी, माहूरगडच्या विकासासाठी 829 कोटी, अष्टविनायक मंदिरांसाठी 147.18 कोटी रुपयांच्या आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली.
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर बहुभाषिक चित्रपटांची निर्मिती करणार.
- महिलांसाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार देणार.
- मुलींसाठी स्वतंत्र ‘आयटीआय’ सुरू करणार.
- धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी राजे यशवंतराव होळकर यांच्या नावे ‘यशवंत विद्यार्थी योजना’ राबविणार. दरवर्षी 10 हजार विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण.
- धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती येथे वसतिगृहे.
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणाली यांचे जतन करणार. त्यात चांदवड, त्र्यंबकेश्वर आणि जेजुरी येथील ऐतिहासिक तलाव, राज्यातील 19 विहिरी, 6 घाट, 6 कुंड यांचे जतन करणार.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List