उद्यापासून बेस्टची दुप्पट भाडेवाढ, किमान तिकीट 10 रुपये; मुंबईकरांवर आणखी एक बोजा
आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट बसच्या तिकिटांच्या दरात दुपटीने वाढ करण्यास परिवहन प्राधिकरणाने अखेर मंजुरी दिली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे साध्या बसचे किमान तिकीट 5 रुपयांवरून 10 रुपये होणार आहे, तर वातानुकूलित बसचे किमान तिकीट 6 रुपयांवरून 12 रुपये होणार आहे. त्यामुळे महागाईने आधीच पोळलेल्या मुंबईकरांवर तिकीटवाढीचा बोजा पडणार आहे.
गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला होता, मात्र शिवसेनेसह सर्वपक्षीय आणि मुंबईकरांनी केलेल्या विरोधानंतर तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मागे घ्यावा लागला होता. परंतु आता पुन्हा बेस्टने मुंबई महापालिका आयुक्तांकडे दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या दरवाढीला मान्यता दिली होती.
महापालिकेने पेले हात वर
डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाने आर्थिक गाडा चालवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी आर्थिक मदतीची मागणी केली, मात्र पालिका प्रशासनाने मागणीपेक्षा कमी अनुदान देत बेस्ट उपक्रमाची बोळवण केली. बेस्टचा कारभार योग्यरीत्या चालवण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात किमान पाच हजार कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली होती, मात्र महापालिकेने बेस्टची केवळ एक हजार कोटींवर बोळवण केली. त्यामुळे अखेर बेस्टला भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागला.
पुन्हा सुरू केले हाफ तिकीट
बेस्ट बसचे दिवसभराचे तिकीट 60 रुपयांवरून 75 रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईची दिवसभराची सफर 75 रुपयांत होणार आहे. विशेष म्हणजे हाफ तिकीट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. वय वर्षे 5 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना हाफ तिकीट दिले जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List