शिवसेना महिला आघाडीचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, लाडक्या बहिणींची महायुती सरकारकडून घोर फसवणूक
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’त महायुती सरकारकडून महिलांची घोर फसवणूक होत आहे. सक्षमीकरणाच्या नावाखाली महिलांवर अन्याय केला जात आहे. त्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. महिलांवरील अन्यायाच्या निषेधार्थ उद्या शिवसेना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. या धडक मोर्चात शिवसेना महिला आघाडीच्या हजारो कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत.
शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, ज्योती ठाकरे आणि शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने उद्या दुपारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा नेण्यात येणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
‘महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने बऱयाच योजनांना जन्म घातला पण त्यातून जे बाळ जन्माला आले ते मुडदूस झाल्यासारखे आहे. महिलांना त्या योजनांचा लाभ योग्य पद्धतीने मिळत नाही. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे,’ अशी टीका पेडणेकर यांनी केली.
‘जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला, विधानसभा निवडणुकीपर्यंत ते बाळ सृदृढ होते, पण निवडणूक झाल्यानंतर त्या बाळाच्या पोटातील प्रोटीन काढून घेण्यास सरकारने सुरुवात केली. दीड हजार रुपयांवरून आता 500 रुपयेच देणार इथपर्यंत सरकार आले आहे. दीड हजाराचे 2100 रुपये करण्याचा वायदा करूनही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. योजना सुरू करताना सरसकट महिलांना योजनांचा लाभ देण्यात आला. जाहिरातींवर सरकारने हजारो कोटी रुपये खर्च केले आणि आता 13 लाख महिला त्या योजनेत अपात्र ठरल्या असल्याचे महायुतीच्या मंत्र्यांकडून सांगितले जात आहे. अगदी यापूर्वी त्या महिलांना योजनेतून मिळालेले पैसेही काढून घेण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. ही घोर फसवणूक असून महायुती सरकार खोटारडे आहे अशी सामान्य महिलांची भावना आहे,’ असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. महानगरपालिका निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल अशीही महिलांना भीती वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार निधीवाटपाचे काम चोख करतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे. अजित पवार यांच्यावर आरोप करून शिवसेनेतून फुटले आणि आता त्यांच्याच नावाने खडे फोडत आहेत, अशा शब्दांत पेडणेकर यांनी यावेळी मिंधे गटावरही निशाणा साधला. ‘महिलांच्या आरोग्याकडेही सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप करतानाच त्यांनी पुणे, नाशिक, मुंबईत उपचाराअभावी बाळंतिणींच्या झालेल्या मृत्यूंचा दाखलाही यावेळी दिला. लाडक्या बहिणींच्या नोंदणीचे काम अंगणवाडी सेविकांना दिले गेले, पण अद्याप त्याचा भत्ता त्यांना मिळालेला नाही. सर्वच बाजूंनी महिलांना सरकारकडून जायबंदी केले जात आहे.’ असा संताप पेडणेकर यांनी व्यक्त केला.
मुंबई–ठाण्यात उद्या मॉक ड्रिल होत असताना शिवसेनेचा मोर्चा काढला जातोय असे प्रसारमाध्यमांनी यावेळी विचारले असता विशाखा राऊत म्हणाल्या की, ‘शिवसेना देशभक्त असून पहलगामच्या मुद्दय़ावरून आम्ही केंद्र सरकारला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे, उद्या दुपारी 3 वाजता सर्व महिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमतील आणि त्यानंतर एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन त्यांना निवेदन देईल, मॉक ड्रिल सायंकाळी असून तत्पूर्वीच मोर्चा आटोपून सर्व महिला घरी पोहोचतील. लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचीही भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार आहोत.’
महिला आघाडीने पोलीस आयुक्तांना दिली पूर्वकल्पना
शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन त्यांना निषेध मोर्चाबाबत पूर्वकल्पना दिली आणि सह्यांचे निवेदनही दिले. शिष्टमंडळात शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, शितल शेठ-देवरुखकर, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, संघटक रंजना नेवाळकर, विभाग संघटक श्रद्धा जाधव, शुभदा शिंदे, पद्मावती शिंदे, रजनी मिस्त्राr, युगंधरा साळेकर, अनिता बागवे, प्रज्ञा सकपाळ, मनीषा नलावडे व माजी नगरसेविका रोहिणी कांबळे उपस्थित होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List