‘ती आमच्या माथी मारू नका..’; हिंदी भाषेच्या सक्तीबाबत हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत
राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. तर इतर माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीबाबत सोशल मीडियावर विविध मतमतांतरे पहायला मिळत आहेत. अशातच दिग्दर्शक हेमंत ढोमेनंही एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित आपलं हिंदी सक्तीविरोधात मत मांडलं आहे.
हेमंत ढोमेची पोस्ट-
‘भारत, एक संघराज्य! राज्यघटनेने दिलेला अधिकार म्हणजे आपलं राज्य आपल्या पद्धतीने चालवायचं.. म्हणून त्या त्या राज्याचं वेगळं सरकार. त्या सरकारांनी आपली संस्कृती, आपली भाषा, आपले विचार जपायचे आणि वाढवायचे. विविधतेने नटलेला माझा देश आता एकाच भाषेच्या आहारी का द्यायचाय? जपू द्या आपली भाषा प्रत्येकाला आणि वाढवू द्या आपली संस्कृती प्रत्येकाला. मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे. हिंदी ही व्यवहाराची भाषा असू द्या. ती आमच्या माथी मारू नका आणि आहेच की ती शिकायला. येतेच आहे की व्यवहारापुरती. मग हा नवा अट्टाहास कशासाठी? महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा-खांद्यावर खेळली पाहिजे, त्यासाठी कष्ट करा,’ अशी पोस्ट हेमंतने लिहिली आहे. या पोस्टच्या अखेरीस त्याने #हिंदी_सक्ती_नकोच असा हॅशटॅग जोडला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलनं केली जात आहेत. या निर्णयाला मराठी एकीकरण समितीनेदेखील विरोध केला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील हिंदी भाषा पहिलीपासून सक्ती करण्याच्या सरकाराच्या धोरणाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर मुळासकट उखडून फेकू, अशी रोखठोक भूमिका ठाकरेंनी घेतली. त्याचप्रमाणे हिंदीची सक्ती पहिलीपासून कशासाठी, असा सवालही त्यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List