Pahalgam Attack Video – हिंदुस्थानी जवानांना पाहून घाबरले पर्यटक, नेमकं काय घडलं?
कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जण मृत्युमुखी पडले. दहशतवादी हल्ला घडल्यानंतरचा एक हृदयद्रावक व्हिडिओ नुकताच समोर आलाय. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर पळत जाणाऱ्या पर्यटकांना जवानांनी थांबवले. जवानांनी थांबवल्यावर घाबरलेल्या पर्यटकांना वाटले की, हे सुद्धा दहशतवादी आहेत. तिथलीच एक पर्यटक महिला दहशतवादी समजून जवानांकडे मुलांचे जीव वाचवण्यासाठी दयेची याचना करु लागते. पहलगाममधील हा व्हि़डीओ अक्षरशः मन सुन्न करणारा आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर सध्याच्या घडीला हल्ल्यानंतर हृदयद्रावक दृश्ये समोर येत आहेत. पहलगामपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक जीव वाचवण्यासाठी पळत होते. तेव्हा काही भारतीय लष्करी सैनिक महिला आणि मुलांच्या ग्रुपला भेटले. सैन्यातील जवानांना दहशतवादी आहेत असं समजून, समोरील महिला तिच्या मुलाच्या जीवाची भीक मागू लागली. हिंदुस्थानी सैन्याच्या सैनिकांनी आपण देशाचेच सैनिक आहोत असं सांगितल्यावर एका महिलेला अश्रू अनावर झाले. त्या महिलेने रडत आपल्या जवानांना सांगितले की, दहशतवाद्यांनी तिच्या पतीची हत्या केली.
त्यावेळी हिंदुस्थानी जवान म्हणतात, आम्ही सैनिक आहोत आणि तुमच्या सुरक्षेसाठी आलो आहोत, तेव्हा ती महिला रडू लागते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. हे दहशतवादी पोलिस आणि लष्कराच्या गणवेशात होते. हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी या पर्यटकांचे सांत्वन केले आणि त्यांना पाणी आणि प्रथमोपचार दिले. इतकंच नाही तर, बैसरन व्हॅलीच्या परिसरातून त्यांना सुरक्षितपणे वाचवले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List