मोदी, तुम्ही माझ्या देवतासमान मातापित्यांचा अपमान केलात, तुम्हाला सोडणार नाही, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

मोदी, तुम्ही माझ्या देवतासमान मातापित्यांचा अपमान केलात, तुम्हाला सोडणार नाही, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

तुम्ही नोटबंदीत आईला रांगेत उभे केले. नक्वदीच्या घरात गेलेल्या मातेला स्वार्थासाठी वापरलेत, तसा मी निर्दयी नाही. आमचे हिंदुत्व पितृदेवो भव, मातृदेवो भव असे आहे.

बाळासाहेबांची नकली संतान, अशी बेताल बडबड करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. हा माझा नाही तर माझ्या देवतासमान माँसाहेबांचा आणि शिवसेनाप्रमुखांचा अपमान आहे. तुम्ही माझ्याशी लढा पण माझ्या मातापित्यांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही. तुम्ही कोणीही असाल तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

मोदीजी, तुमच्यावर आईवडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील, पण मी सुसंस्कृत घराण्यातील आहे. घराणेशाहीचे वावडे तुम्हाला असेल, पण मला अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे नाव सांगायला लाज वाटत असेल. तुम्ही नोटबंदीत आईला रांगेत उभे केले. नक्वदीच्या घरातील मातेला तुम्ही स्वार्थासाठी वापरलेत तसा मी निर्दयी नाही. आमचे हिंदुत्व पितृदेवो भव, मातृदेवो भव असे आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर हल्ला चढवला. मला नकली संतान म्हणता, अरे तुम्हीच नकली आहात, बेअकली आहात, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी लगावली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथे जाहीर सभा झाली. त्या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेचा अस्सल ठाकरी भाषेत समाचार घेतला.

पश्चिम हिंदुस्थानातील लोक अरबांसारखे दिसतात असे वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केले होते. ते महाराष्ट्राला मान्य आहे का, असा सवाल तेलंगणा येथील सभेमध्ये करताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा नकली संतान असा उल्लेख केला होता. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी, माझ्याशी लढा, पण माझ्या आईवडिलांचा अपमान केलात तर सहन करणार नाही, असे ठणकावून सांगितले. मोदीजींबद्दल मला आदर होता असे आता म्हणावे लागेल, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मोदींना सर्वत्र उद्धव ठाकरे दिसताहेत. अहो, मी महाराष्ट्रात तुमच्याविरुद्ध उभा आहे, पण त्यांना काय झालेय कुणास ठाऊक? असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अरे नकली माणसा, पंतप्रधान पदासाठी माझी सही घ्यायला लाज नाही वाटली?

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पूर्व इतिहास सांगत पंतप्रधान मोदींचा अचूक वेध घेतला. आज नकली संतान म्हणताय, पण नकली माणसा, 2014 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना तुम्ही माझीच सही घेतली होती. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी असतील म्हणून. त्यावेळी सही घेताना लाज नाही वाटली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मोदींचा बोगसपणा खतम करून टाकायचाय

2014 च्या विधानसभा निवडणुकीत चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार पाडा असे आदेश दिले होते असा गौप्यस्पह्ट कोल्हापुरातील एका माजी नगरसेवकाने नुकताच केला. असले पाप शिवसेनेने कधी केले नाही. शिवसेनेने मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी निष्ठsने काम केले होते, पण भाजपने पाठीत वार केला. वाजपेयी सरकारच्या काळात गुजरात दंगलीवरून ज्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवले त्यांच्याच मुलाला आता मोदी नकली संतान म्हणताहेत. हा बोगसपणा भाकडपणा शिवसेनेला खतम करून टाकायचाय, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

हुकूमशाहीविरुद्ध एकही मत नासता कामा नये

भाजप काय करते, प्रत्येक ठिकाणी एक डायरेक्ट उमेदवार, एक गद्दार उमेदवार आणि तिसरा भाजपविरोधातील मते पह्डणारा छुपा उमेदवार उभा करते आणि तिरंगी लढाई आहे असे चित्र उभे करते. पण शिर्डीत तिरंगी नाही तर तिरंग्यासाठी लढाई आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच शिवसेनेच्या जयघोषाने सभास्थळ दुमदुमले. आपल्या विरोधातील मते नासवायची कशी हे भाजपला चांगले समजते. ही लढाई तिरंग्यासाठी आहे. लोकशाही संपवायला निघाले आहेत. त्यामुळे हुकूमशाहीविरुद्धचे एकही मत नासता कामा नये, मशाल म्हणजे मशालीलाच मिळाले पाहिजे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

भाजपला निवडणुकीत असे झोपवा की, कांदाच मागितला पाहिजे 

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मोदी फार तावातावाने बोलायचे. मनमोहन हे पंतप्रधान आहेत, पण त्यांना महागाईतला म बोलता येत नाही असे म्हणायचे. आता मोदी गाईवर बोलतात मग महागाईवर का नाही बोलत? शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या आत्महत्यांबद्दल ‘आ’ का नाही करत. कांदा उत्पादक शेतकऱयांनो, आता भाजपला असे सोडायचे नाही. निवडणुकीत यांना असे झोपवून काढायचे की, यांनी कांदा मागितला पाहिजे. ठेच कांदा आणि लाव माझ्या नाकाला, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना केले.

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱयांचे जवळपास अकराशे कोटी रुपयांचे नुकसान तुम्ही केले आहे. कुठे फेडाल हे पाप? निर्यातबंदी केल्याने कांद्याचा जो भाव पडला त्याची भरपाई शेतकऱयांच्या खात्यात का टाकली नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी मोदींना केला

मोदी सरकार हे देश नासवून टाकणारे सरकार आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, मोदी सरकारला सर्वसामान्यांचे मुद्दे दिसत नाहीत. शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्याबद्दल मोदी बोलायला तयार नाहीत. शेतकऱयाच्या पत्नीचे मंगळसूत्र तुटतेय त्या मंगळसूत्राबद्दल बोलायला तयार नाहीत. अनेक ठिकाणी बेकारांचे तांडेच्या तांडे फिरताहेत त्या बेकारीतला बे काढायला तयार नाहीत. मग कोणत्या देशाचे तुम्ही पंतप्रधान आहात? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

निळवंडे धरण तुम्ही बनवले मग महाविकास आघाडी सरकारने दिलेला पैसा गेला कुठे? 

नगरमधील निळवंडे धरण महायुती सरकारनेच पूर्ण केले असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला होता. मोदींचा तो खोटारडेपणाही उद्धव ठाकरे यांनी आज चव्हाटय़ावर आणला. निळवंडे धरण आम्हीच केले अशा बढाया मारता, मग महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणे, कालवे आणि इतर पाण्याच्या योजनांसाठी दिलेले हजारो कोटी रुपये गेले कुठे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

…हे म्हणजे दुसऱयाचे पोर कडेवर घ्यायचे आणि त्यावर आपला शिक्का मारायचा 

मोदी म्हणाले 50 वर्षे हे धरण खोळंबले होते. दरम्यान अटलबिहारी वाजपेयी सरकार होते, मग युतीचे होते, नंतर फडणवीस सरकार होते. मग 50 वर्षे लटकलेले काम भाजपने गद्दारी करून सरकार पाडल्यानंतर वर्ष-सहा महिन्यांत पूर्ण झाले. हे पटतेय तुम्हाला? असे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नगरकरांनाच विचारताच त्यांनी नाही असे उत्तर दिले. त्यावर, म्हणजे दुसऱयाचे पोर कडेवर घ्यायचेच, पण त्याच्यावर आपला शिक्का मारून टाकायचा असली ही भाजपची वृत्ती आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, आमदार शंकरराव गडाख, आमदार नितीन देशमुख, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मोदीजी, सारखं बाळासाहेब, बाळासाहेब काय? बाळासाहेब बोलायच्या आधी हिंदुहृदयसम्राट बोला, नाहीतर आम्ही शिकवणी लावतो तुम्हाला. तरीही जीभ वळत नसेल तर माझा महाराष्ट्र वळवून दाखवेल. घटना बुडवायला निघालेल्यांचा गजर का करायचा? साईनामाचा गजर केला तर संकटे पाठच्या पाठी पळून जातात. साईबाबांच्या चमत्कारांच्या कथा अशाच आल्या नव्हत्या. गरीबाघरची दिवाळी तेल परवडत नाही म्हणून पाण्याचे दिवे पेटवणारा तो महात्मा होता. मोदींच्या काळात तेल तर सोडा, पाणीही मिळत नाही. काय पेटवायचे? मग तुमच्या हुकूमशहांचे सिंहासनच आम्ही पेटवून टाकतो.

झोपेअभावी मोदींच्या शरीर, बुद्धीवर दुष्परिणाम झालाय…त्यांना झोपवा!

जळगावच्या सभेत अॅड. असीम सरोदे यांनी भाषणात सांगितले की, मोदी झोपतच नाहीत. जो झोपत नाही त्याच्या शरीरावर आणि बुद्धीवर दुष्परिणाम होतो असे वैद्यकीय शास्त्र सांगते. त्यामुळे मला भाजपवाल्यांना सांगावेसे वाटते की, ‘तुम्ही तरी इतका निर्दयपणा दाखवू नका, मोदींना आराम द्या, त्यांना झोपवा थोडे!’ अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी मारली. आता पंतप्रधानांनाच झोप नसल्यानंतर जनतेनेच ठरवायचे की देश आता कुणाच्या हातात द्यायचा, असेही ते म्हणाले.

कश्मीरातून 370 कलम का हटवले नाही?

असीम सरोदेंनी 370 कलमाबद्दल दिलेल्या माहितीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, सरोदे यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. मोदी सरकारने 370 कलम काढलेलेच नाही. फक्त 370 ब ला स्थगिती दिली. कश्मीरमध्ये बाहेरची माणसे जमीन खरेदी करू शकत नव्हती ती मुभा त्यामुळे मिळाली. जमीन कोणी खरेदी केली, अदानींनी. का खरेदी केली तर मोबाईल, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीला लागणारे लिथियम तिकडे जास्त प्रमाणात मिळते. म्हणूनच मोदी सरकारने अदानींसाठी 370 कलम स्थगित केले आणि त्यांना जागा घेऊन देताहेत म्हणजे पैसा पुन्हा कुठे गेला तर गुजरातला. शिवसेनेनेही भाबडेपणाने संसदेत मोदी सरकारला पाठिंबा दिला होता, असे सांगतानाच, 370 कलम तुम्ही का काढले नाही? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला केली.

गद्दाराचे डिपॉझिट जप्त करा

त्यांना सभेला भाडय़ानं माणसं आणावी लागतात. भाडय़ानं उमेदवार घ्यावा लागतो. प्रचारकसुद्धा भाडय़ाने लागतात असा मिंधे आणि भाजपवर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. चूक झाली तर माफ करतो पण गद्दाराला माफी नाही. गद्दाराचे डिपॉझिट जप्त करा असे अवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

जो बूंद से गयी वो नौटंकी से नही आयेगी

पंतप्रधान मोदी 17 तारखेला मुंबईत येणार आहेत. ते शिवाजी पार्कवर येतील. बाळासाहेबांच्या स्मारकावर जातील. नाक रगडतील. स्टेजवर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून ढसाढसा रडतील. हो… ही नकली माणसे आहेत, बेअकली माणसे आहेत. मला नकली संतान म्हणत असतील तर मोदीही नकली आहेत, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. बूंद से गयी वो नौटंकी से नही आयेगी मोदीजी, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान? उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?
महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळं ठाकरे बंधूंसाठी सुद्धा ही निवडणूक वेगळी ठरली. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केलं. तर...
संथ गतीनं मतदानावर उद्धव ठाकरेंचा संताप, पियुष गोयलही भडकले!
देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात हिंगोली अव्वल! मराठवाड्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकावर
बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप
मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही! मनोज जरांगे पाटील यांचा खुलासा, 4 जूनपासून उपोषणावर ठाम