मनमानीपणे गाडी पार्क केल्यास मोबाईलवर थेट चलन, ठाणे वाहतूक शाखेचा बेशिस्तीला ‘ब्रेक’
वाहतूककोंडी आणि बेशिस्त पार्किंगमुळे ठाणेकर अक्षरशः त्रासले आहेत. यावर उपाय म्हणून ठाणे वाहतूक शाखेने कडक मोहीम हाती घेतली आहे. थेट रस्त्यावर उतरून वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली असल्याने मनमानी आणि बेशिस्त पार्किंगला आता ‘ब्रेक’ लागणार आहे. त्यामुळे यापुढे ठाण्यातील रस्त्यावर कुठेही वाहन लावून जात असला तर मोबाईलवर तत्काळ चलन येणार, असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.
शहरातील प्रमुख मार्गांवर ‘पार्किंग १’ आणि ‘पार्किंग २’ अशी व्यवस्था असूनही अनेक जण मनमानी पद्धतीने जागा मिळेल तिकडे, कशीही वाहन रस्त्यावर उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. चुकीच्या ठिकाणी लावलेल्या वाहनांमुळे मोठमोठे रस्तेही अरुंद होत आहेत आणि कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. वारंवार तक्रारी आल्याने वाहतूक शाखेने कठोर पावले उचलली आहेत. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रस्त्यांवर गस्ती पथके तैनात असून चुकीचे पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कोणतीही सूट न देता दंडाची रीतसर नोंद केली जात आहे.
नियमभंग सहन केला जाणार नाही
शहरातील शिस्त राखण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. ‘बेशिस्त पार्किंगमुळे शहर ठप्प होत आहे. नियमभंग सहन केला जाणार नाही,’ असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List