इलेक्शन न होताच झालेले सिलेक्शन घटनाबाह्य! ‘एमओए’च्या निवडणुकीत लोकशाहीची थट्टा, मतदान न होताच सर्व उमेदवारांची माघार
महाराष्ट्रात सध्या पक्षचोरी करून घटनाबाह्य सरकार काम करत असताना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) यंदाच्या (2025-29) निवडणुकीतही असाच घटनाबाह्य प्रकार बघायला मिळाला. रविवारी (दि. 2) मुंबईमध्ये मतदान प्रक्रिया न होताच ‘एमओए’ची ही निवडणूक गुंडाळण्याचा अजब प्रकार घडला. चक्क निवडणुकीच्या दिवशीच सर्व उमेदवारांनी माघार घेत पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीचे अधिकार ‘एमओए’चे अध्यक्ष अजित पवार यांना दिल्याचे समजले अन् लोकशाहीने दिवसाढवळय़ा हा नंगानाच बघितला. उमेदवार माघारीची मुदत केव्हाच संपूण गेलेली असताना ऐन मतदानाच्या दिवशी सर्व उमेदवारांनी माघार घेत एक प्रकारे लोकशाहीची थट्टाच केली, असे म्हणावे लागेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधील सत्तेला यंदाच्या निवडणुकीत पेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आव्हान दिल्याने राज्याचे क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी निवडणुकीचा धुरळा उडाला होता, मात्र पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर पवार-मोहोळ यांच्यात समझोता झाला अन् ‘एमओए’च्या घटनेला केराची टोपली दाखवत मतदानाच्या दिवशी सर्व उमेदवारांनी माघार घेण्याचा हास्यास्पद प्रकार घडला. त्यामुळे इलेक्शन न होताच अजित पवार हे नव्या कार्यकारिणीचे सिलेक्शन करणार असून मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित 20 कार्यकारिणी सदस्य व 7 पदाधिकारी यांची निवड सोमवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र या घटनाबाह्य निवडणूक प्रक्रियेबद्दल कोणी न्यायालयाचे दार ठोठावल्यास नवल वाटायला नको.
निवडणूक अधिकारीही पडले बळी
‘एमओए’च्या निवडणुकीत आज मतदान प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, ‘सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने माझाही नाइलाज झाला,’ अशी हतबलता निवडणूक अधिकारी शि. ना. सरदेसाई यांनी दै. ‘सामना’शी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘माझ्या कारकीर्दीत असा प्रकार मी पहिल्यांदाच बघितलाय. सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने मीदेखील त्यांच्या माघारीच्या अर्जांवर स्वाक्षरी केली आहे.’ याचाच अर्थ निवडणूक अधिकारीही या घटनाबाह्य निवडणूक प्रक्रियेचे बळी ठरले आहेत. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांचा हा निर्णय वादात सापडण्याची दाट शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List