लोखंडी सांगाडा तेवढा उरला! ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल जमीनदोस्त
परळ-प्रभादेवीतील नागरिकांचा शेकडो वर्षांचा सोबती राहिलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल अखेर रविवारी जमीनदोस्त झाला. पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूकडील पुलाचे भक्कम दगडी बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. आता केवळ पुलाचा लोखंडी सांगाडा उरला आहे. मध्य मुंबईतील अनेक घटनांचा साक्षीदार राहिलेला हा पूल जमीनदोस्त होताना पाहून प्रभादेवी आणि परळचे रहिवासी भावुक झाले.
नियोजित वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या बांधकामासाठी एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम 12 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले होते. त्यानंतर मागील दीड महिना पूर्व व पश्चिमेकडे पालिकेच्या हद्दीतील पुलाचे दगडी बांधकाम हटवण्याचे काम सुरू राहिले. रविवारी शेवटच्या टप्प्यातील दगडी भिंत आणि मातीचा ढिगारा जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आला. त्यामुळे शेकडो वर्षांचा सोबती राहिलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल जमीनदोस्त झाल्याचे दुःख प्रभादेवी आणि परळच्या परिसरातील नागरिकांना झाले. गेले दीड महिना पुलावरील रस्ता आणि आतील माती हटवली जात होती. त्यानंतर दगडी भिंत हटवण्याचे काम करण्यात आले. त्या भिंतीचा शेवटचा टप्पा जमीनदोस्त होताना पाहून एक जुना सोबती काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख झाले, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. 1913 मध्ये या पुलाचे काम केले होते. भक्कम बांधकामामुळे पूल पूर्णपणे जमीनदोस्त करण्यास दीड महिना लागला, असे पूल बांधकामाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. पुलाचा उरलेला लोखंडी सांगाडा रेल्वे मार्गांवर असून त्यापैकी 72 मीटरचा भाग मध्य रेल्वेच्या, तर 62 मीटर भाग पश्चिम रेल्वेच्या हद्दीत आहे.
सात दिवसांनी लोखंडी सांगाडा हटवण्याला सुरुवात होणार
रेल्वेच्या हद्दीतील एल्फिन्स्टन पुलाचा सांगाडा हटवण्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी किमान सात दिवस लागतील, असे ‘महारेल’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारपासून पुलाच्या ठिकाणी 800 मेट्रिक टनच्या दोन महाकाय व्रेन उभ्या करण्याचे काम हाती घेतले जाईल. दोनपैकी एक व्रेन प्रत्यक्ष काम करेल, तर दुसरी व्रेन ‘बॅकअप’ म्हणून तैनात असणार आहे. दोन्ही रेल्वे मार्गांवरील 78 ब्लॉकच्या नियोजनाची सध्या प्रतीक्षा केली जात आहे. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी शक्य असेल त्यादिवशी ब्लॉकचे तास वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List