मुलांचे सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करायचे असेल तर ‘या’ बियाणांपासून बनवा लाडू, रोगप्रतिकारक शक्तीही होईल बूस्ट
वातावरणाच्या बदलामुळे लहान मुलांना खोकला आणि सर्दी यांचा सर्वाधिक त्रास होतो. त्याचबरोबर कमकुवत झालेली रोग प्रतिकारशक्ती ही एक सामान्य समस्या बनली आहे. त्यात काही लोकं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक औषधांचे सेवन करत असतात. परंतु घरगुती पदार्थ जसे की तूप , धान्य आणि ड्रायफ्रूट्सपासून बनवलेले लाडू नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला बळकटी देतात. अशातच बहुतेक भारतीय गहू आणि बेसनापासून बनवलेले लाडू खातात.
तर काही ठिकाणी अळशी, तीळ, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बियांसारख्या इतर अनेक बियांपासून लाडू बनवतात आणि त्याचे सेवन करतात. या बियांमध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारे घटक असतात. आजच्या लेखात आपण अळशीच्या बियांपासून लाडू कसे बनवायचे त्यातील घटकांबद्दल जाणून घेऊयात…
अळशीचे पोषक घटक
अळशीच्या बियांमध्ये कॅलरीज, प्रथिने, हेल्दी फॅट, ओमेगा-3 फॅटी ॲसिड , कार्ब्स , कॅल्शियम , फायबर, लोह, पोटॅशियम , फॉस्फरस , जस्त आणि जीवनसत्त्वे बी 1 आणि बी6 असल्याने ते पोषक तत्वांचे भांडार आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात जस्त महत्त्वाची भूमिका बजावते अशातच 100 ग्रॅम अळशीच्या बियांमध्ये 4.3 मिलीग्राम जिंक असते . शिवाय त्याच प्रमाणात अळशीच्या बियांमध्ये अंदाजे 530 ते 550 कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. त्यात 810 मिलीग्राम अळशीमध्ये पोटॅशियमचे सर्वाधिक प्रमाण असते , ज्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. तर अळशीच्या बियांमध्ये 27 ग्रॅम फायबर देखील असते, जे बद्धकोष्ठता रोखण्यासाठी प्रभावी आहे.
जवसाचे लाडू कसे बनवायचे?
तुम्हाला जर गव्हाच्या लाडूपेक्षा काहीतरी वेगळे बनवायचे असेल, तर तुम्ही अळशीच्या बियांचे लाडू बनवू शकता. अळशीच्या बिया आणि गूळ वापरून बनवलेले हे लाडू हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी उत्तम आहेत, कारण दोन्ही घटकांचा उबदारपणावर परिणाम होतो. चव वाढवण्यासाठी तुम्ही अळशीच्या लाडूमध्ये मखाना आणि सुकामेवा त्यात मिक्स करू शकतात.
लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
अळशीच्या बिया (अर्धा किलो)
गूळ (750 ग्रॅम)
देशी तूप (अर्धा कप)
सुके नारळ ( किसलेले ) 1/4 कप
बदाम ( बारीक चिरलेले)
काजू ( बारीक चिरलेले)
बनवण्याची पद्धत
प्रथम अळशी भाजून घ्या आणि थंड झाल्यावर त्यांची पावडर बनवा. नंतर सुकामेवा थोड्या तुपात तळा. एका पॅनमध्ये गूळ टाकून त्याचा पाक तयार करा. या गुळाच्या पाकामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करा. त्यानंतर त्यात तूप टाका आणि मिश्रण एकजीव करून शिजवा. मिश्रण कोमट झाल्यावर लाडू बनवा. तुमचे अळशीचे लाडू तयार आहेत.
अळशीच्या लाडूंचे आरोग्यदायी फायदे
उबदारपणाचा प्रभाव : अळशी आणि गुळापासून बनवलेले हे लाडू हिवाळ्यात मुलांसाठी वरदान ठरतात, कारण गूळ आणि अळशी दोन्हीचा उबदारपणाचा प्रभाव असतो. हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी ते प्रभावी ठरते.
ऊर्जेचा स्रोत : अळशी, तूप आणि गूळ हे सर्व शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. जी लोकं जीम किंवा व्यायाम रोज करतात ते दररोज एक लाडू खाऊन त्यांचे शरीर दीर्घकाळ ऊर्जावान ठेवू शकतात .
हृदयाचे आरोग्य चांगले राहते : हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिड अत्यंत महत्त्वाचे असतात . अळशी हे ओमेगा-3 फॅटी ॲसिडचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते . शिवाय या बियामध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते .
पचनक्रिया सुधारणे : अळशी आणि गूळ हे फायबरचे चांगले स्रोत आहेत , म्हणून ते खाल्ल्याने पोट निरोगी राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी दिवसातून एक अळशीचा हा लाडू खावेत असे तज्ञांचे मत आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List