ठाण्यात ‘आपला दवाखाना’ला टाळे; परिचारिकांचा पगार रखडला, काही गाळ्यात साड्यांची दुकाने थाटली, भाजप आमदार केळकर यांनी शिंदेंच्या योजनेवर बॉम्ब फोडला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा, जाहिरातबाजी करत ठाण्याच्या गल्लीबोळात ‘आपला दवाखाना’ सुरू केला खरा. मात्र हे दवाखाने काही महिन्यांतच सलाईनवर गेले असून अक्षरशः ओस पडले आहेत. संतापजनक म्हणजे कंत्राटदार कंपनीने येथे काम करणाऱ्या परिचारिकांचे पगार ही रखडवले आहेत. तर काही ठिकाणच्या गाळ्यांमध्ये चक्क साड्यांची दुकाने थाटल्याचा आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. दरम्यान केळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या या योजनेवर बॉम्ब फोडल्याने शिंदे गटात पुन्हा अस्वस्थता पसरली आहे.
ठाण्यातील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत या दृष्टीने आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्यात आली. दिल्लीतील मोहल्ला विलनिकच्या धर्तीवर ठाण्यातही ४५ हून अधिक ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला. याठिकाणी रुग्णांना मोफत औषधोपचार, ईसीजी, रक्त तपासणी, औषधे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. आपला दवाखाना हा उपक्रम राबवण्यासाठी ठाणे महापालिकेने बंगळुरू येथील मेडको नावाच्या कंपनीला कंत्राट दिले. ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होते, मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडले असल्याचा आरोप संजय केळकर यांनी केला आहे. दरम्यान मागील सहा महिन्यांचा पगारदेखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेला नसल्याने कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी कोरडी गेली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
अन्यथा मुख्यालयावर मोर्चा
कंत्राटदार कंपनीला ५६ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी ही कंपनी महापालिकेला दाद देत नाही. त्यामुळे महापालिकेने कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केळकर यांनी केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा या कर्मचाऱ्यांना घेऊन पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही केळकर यांनी प्रशासनाला दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List