भाजपनं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईत ठाकरे बंधुंचाच महापौर होईल; संजय राऊत यांचं विधान, मिंध्यांच्या दिल्ली दौऱ्यावरही टीका
भारतीय जनता पक्षाने कितीही गर्जना केल्या तरी मुंबईत ठाकरे बंधुंचाच महापौर होईल, यात दुमत असण्याचे कारण नाही. मुंबई, ठाण्यात ज्या पद्धतीचे वातावरण आहे त्यावरून भाजप-मिंधे गटाचा पराभव स्पष्ट दिसतोय, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपने केलेल्या 150+ नाऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केले. यावेळी त्यांनी शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचाही समाचार घेतला.
शनिवारी सकाळी माध्यमांनी संजय राऊत यांनी भाजपने दिलेल्या नाऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मला असे वाटते त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भाजप 150+ चा नारा देईल. शिंदे गट 120 चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील. आम्हाला सगळ्यांना राजकारणातून संन्यास घेऊन हरी हरी करत केदारनाथला जाऊन मोदींच्या गुफेत बसावे लागेल. आता ‘अब की बार…’ वाले पियुष पांडेही राहिलेले नाहीत. त्याच्यामुळे त्यांचे आता ‘अब की बार मोदी सरकर’, ‘अब की फडणवीस सरकार’ अशा घोषणा कोण लिहिणार. भाजपने कितीही गर्जना केल्या तरी मुंबईत ठाकरे बंधुंचाच महापौर होईल याच्यामध्ये कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. हे जे आता बोलत आहेत हे त्यांचे उसणे अवसान आहे.
भाजपने आकडा सांगितला तुमचे टार्गेट काय असे विचारले असता राऊत म्हणाले की, आमचा महापौर होईल म्हणजे आमचे टार्गेट पूर्ण आहे. आमचा महापौर शंभर टक्के बसणार आणि सातत्याने बसणार. कोणाच्याही टेकू शिवाय बसणार. मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि सहकारी पक्ष असे एकत्र येऊन 55 ते 60 टक्के मतं घेत आहोत. आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल. बहुमतासाठी भाजपला जे करावे लागते, तोडाफोडी, माणसं विकत घेणे हे आम्हाला करावे लागणार नाही. मुंबईचा महापौर मराठी आणि भगव्या विचारांचा होईल, असेही राऊत ठामपणे म्हणाले.
इतर ठिकाणी वेगळे लढणारे महायुतीतील पक्ष मुंबई मात्र एकत्र लढणार असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावरही राऊत यांनी भाष्य केले. मुंबईच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये भीती आणि शंका आहेत. ठाकरे बंधुंनी जे वादळ उभे केले आहे त्या वादळाशी सामना करणे भाजप, मिंधेंना शक्य नाही. अजित पवारांचा तर प्रश्नच येत नाही. म्हणून एकत्र येत आहेत, फोडाफोडी सुरू आहे, असे राऊत म्हणाले. मिंध्यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले की, अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून ते पळत ज्यांच्याकडे जाणार नाही तर कुठे जाणार. अमित शहांनी त्यांना ती शिवसेना बनवून दिली असून बॉसच्या चरणात ते गेले असावेत, अशी टीका राऊत यांनी केली.
राज्यात अनागोंदी; पोलीस आणि कायद्याचं भय नष्ट झालंय, गृहखातं अजगराप्रमाणे निपचित पडलंय! – संजय राऊत
भाजपात 60 टक्के आमदार बाहेरून आलेले
नितीन गडकरी यांनी केलेले विधानावरही संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टिप्पणी केली. नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात. गेल्या काही काळातील त्यांची भाषणे ऐकली तर त्यांनी कान टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतो का? महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जो भाजप आहे, तो मूळ भाजपा नसून डुप्लिकेट, सुजलेला, फुगलेला भाजप आहे. भाजपातील आजचे 60 टक्के आमदार बाहेरून आलेले आहेत. भाजपचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, जे स्वत:ला नेते म्हणून मिरवतात हे कधीकाळी भाजप विरोधात काम करणारे लोक होते. त्यांना भाजपची विचारधारा काय माहिती. जे काल पर्यंत संघाच्या हाफ चड्डीवर घाणेरड्या शब्दात टीका करत होते, आज ते संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना पाहतो तेव्हा लोक हसतात, लोकांना गंमत वाटते, लोक त्याची मजा घेतात. भाजपमध्ये त्याच्या स्वत:चे 20 टक्के लोक असून बाकी सगळे बाहेरून आलेले हौशे, नवशे, गवशे लोक आहेत. त्यामुळे गडकरी सारख्या जुन्या, जाणत्या नेत्यांची वेदना खरी आहे, असे राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List