भेकराची शिकार भोवली; राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाला अटक, मांस फ्रीजमध्ये ठेवले
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अलिबाग प्रभारी तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत यांना भेकराची शिकार भोवली आहे. संरक्षित वन्य प्राण्याची शिकार करून त्याचे मांस घरातील फ्रीजमध्ये ठेवल्याप्रकरणी भगत यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे मांस जप्त केले असून भगत यांना अलिबाग वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे अधिकारी त्यांची कसून चौकशी करीत असून यापूर्वीही त्यांनी अन्य काही प्राण्यांची शिकार केली असल्याची शक्यता आहे.
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य येथे जयेंद्र भगत यांनी भेकर जातीच्या संरक्षित वन्यजीव प्राण्याची शिकार करून त्याचे मांस घरात ठेवले असल्याची खबर पोलिसांना लागली होती. पोलीस निरीक्षक एस. व्ही. लांडे यांनी पथकासह दोन पंच सोबत घेऊन जयेंद्र भगत यांच्या अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथील घरावर धाड टाकली. संपूर्ण घराची झाडाझडती घेतली असता स्वयंपाक खोलीतील फ्रिजमध्ये भेकर प्राण्याचे सुमारे एक किलो मांस सापडले. पोलिसांनी जयेंद्र भगत यांना ताब्यात घेत भेकराचे मांस जप्त केले आहे. जयेंद्र भगत यांच्यासोबत शिकार करताना आणखी कोण साथीदार होते, याचा पोलीस व वनविभाग अधिकारी तपास करीत आहेत.
यापूर्वीही दोन गुन्हे दाखल
जयेंद्र भगत हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच महिला व बालविकास आदिती यांच्या कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी जयेंद्र भगत यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारी अलिबाग तालुकाध्यक्ष पदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात यापूर्वीही दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
यांनी केली कारवाई
मांडवा पोलीस निरीक्षक एस. व्ही. लांडे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक निरीक्षक सरिता मुसळे, मांडवा पोलीस हवालदार प्रदीप देशमुख, जितेंद्र चवरकर, गणेश पारधी यांच्यासह अलिबाग पोलीस शिपाई सागर गोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List