धक्कादायक! महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप करीत महिला डॉक्टरची आत्महत्या
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने ऐन दिवाळीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने फलटणसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या महिला डॉक्टरने तळहातावरच ‘सुसाइड नोट’ लिहिली असून, त्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा व त्याचा सहकारी प्रशांत बनकर याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक बदने फरार आहे.
फलटण येथील हॉटेल ‘मधुदीप’मधील खोलीत गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास या महिला डॉक्टरनी ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादातून ही आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्या हॉटेलवर गेल्या की त्यांना नेले? तसेच त्यांच्यावर अत्याचार झाला का? याबाबत तपास सुरू आहे.
मूळच्या बीड जिह्यातील या महिला डॉक्टर फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्या फलटणमध्येच एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहत होत्या. काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील कामकाज करत असताना त्यांचा काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याशी मोठा वाद झाला होता. त्या वादातून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. हा त्रास असह्य होत असल्यामुळे त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठांकडे याबाबत माहिती दिली होती. तसेच वारंवार तोंडी तक्रारी केल्या होत्या. ‘आपणास विनाकारण त्रास दिला जात असून, हा त्रास न थांबल्यास मी आत्महत्या करेन,’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी वरिष्ठांना आपल्याला होणाऱ्या त्रासाची दाहकता सांगितली होती. त्याचप्रमाणे आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागेल, याची कल्पनाही दिली होती. तरीही वरिष्ठांनी या तक्रारींची दखल घेतली नाही आणि या बाबतीत कठोर पाऊलही उचलले नाही. शेवटी या तरुण डॉक्टरने गुरुवारी पहाटे गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
तत्पूर्वी त्यांनी तळहातावर ‘सुसाइड नोट’ लिहिली. त्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचे व त्याचा सहकारी प्रशांत बनकर याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे नमूद केले आहे. या डॉक्टरच्या आत्महत्येचे वृत्त आज सर्वत्र वाऱ्यासारखे पसरले आणि संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली. याबाबत संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकरणी प्रथमदर्शनी पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने व तपासही स्थानिक पोलीस करणार असल्यामुळे त्यांना न्याय मिळेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव?
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलून देण्यासाठी या डॉक्टरांवर उपजिल्हा रुग्णालय अधिकारी-कर्मचारी व पोलीस अधिकारी-कर्मचारी दबाव आणायचे. त्यामुळे त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रारही केली होती, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ही आत्महत्या नसून, त्यांची हत्या असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
निलंबनाचा आदेश
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून या प्रकरणातील संशयित आरोपींना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्हा पोलीसप्रमुख तुषार देशमुख यांना सर्व माहिती घेऊन ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गुन्हे दाखल
उपनिरीक्षक गोपाल बदने आणि त्याचा सहकारी प्रशांत बनकर याच्याविरोधात फलटण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List