‘गोकुळ’च्या डिबेंचरचा मुद्दा तापला, शेतकऱ्यांची जनावरांसह धडक; सत्ताधारी महायुतीमध्येच बिघाडी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’मधील प्राथमिक दूध संस्थांना फरकापोटी जाहीर केलेल्या रकमेतून डिबेंचर म्हणून 40 टक्के रक्कम कपात केली जात आहे. याविरोधात आज संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’ कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी ‘जय श्रीराम’चा नारा देत जनावरे कार्यालयात घुसविल्याने पोलीस आणि आंदोलकांत झटापट होऊन गोंधळ उडाला होता.
शौमिका महाडिक यांनी डिबेंचर मुद्दय़ावरून ‘गोकुळ’ अध्यक्षांनी माहिती दिली पाहिजे, अशी मागणी करीत गोकुळ प्रशासनाला निवेदन दिले. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यानंतर झालेल्या नाटय़मय राजकीय घडामोडींत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांना चेअरमन करून ‘गोकुळ’वर प्रथमच महायुतीची सत्ता आणल्याचा दावा केला जात आहे. पण भाजपच्या पदाधिकारी व संचालिका शौमिका महाडिक यांनीच मोर्चा काढून चेअरमन मुश्रीफ यांना उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे. अध्यक्षांची काय भूमिका आहे, ते काय निर्णय घेणार आहेत, त्यांना त्याचे गांभीर्य आहे का? असा सवाल करीत, गेल्या चार वर्षांत शासनाचा लेखापरीक्षण अहवाल त्यांच्याविरोधात जात असल्याचा इशारा दिल्याने महायुतीत ‘बिघाडी’ झाल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
शौमिका महाडिक म्हणाल्या, गेल्या 12 दिवसांत एकही मीटिंग झालेली नाही. ‘गोकुळ’चे व्यवस्थापकीय संचालक फक्त तांत्रिक गोष्टी सांगत आहेत. त्यामुळे चार प्रतिनिधींना बोलवून प्रशासन आणि संस्था प्रतिनिधींनी सुवर्णमध्य काढणे गरजेचे होते. शेतकऱ्यांची डिबेंचरची रक्कम 40 टक्के कपात म्हणजे गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कपात आहे. दिवाळी तोंडावर असताना दूध उत्पादकांना जास्त पैसे दिले तर ते चांगले होईल. आतापर्यंत 10 टक्के रक्कम कपात केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
विनाटेंडर जाजम, घडय़ाळ खरेदीचे पुढे काय?
गोकुळ दूध संघातील दूध संस्थांना पावणेचार कोटींचे नियमबाह्य व विनाटेंडर जाजम व घडय़ाळ खरेदी करून वाटप करण्यात आल्याने त्याच्या चौकशीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. चौकशी अधिकारी नेमल्यानंतर त्यांची लगेच बदली करण्यात आली. आता आवश्यक कर्मचारी नसल्याने ही चौकशी रखडल्याचे समोर आले. कर्मचारी उपलब्ध करून दिल्यानंतर चौकशीचे पुढे काय झाले याबाबत अजूनही ठोस माहिती समोर आली नाही. त्यामुळे ही चौकशी होणार की नाही, अशी विचारणा होऊ लागली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List