दोन महिने नव्हे तर 12 महिन्यांनंतर पीएफची पूर्ण रक्कम काढता येणार
ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कोटय़वधी पीएफ अकाऊंट होल्डर्ससाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने अलीकडेच झालेल्या बैठकीत पीएफचे पैसे काढण्यासंबंधित नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमानुसार, नोकरी सुटल्यानंतर दोन महिन्यांत नव्हे तर 12 महिन्यांनंतर पीएफचे पूर्ण पैसे काढता येतील. तसेच 36 महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यावर पेन्शनची रक्कम काढता येईल.
कामगारमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्या झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पीएफमधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. नवे नियम चांगले असले तरी काही अंशी ईपीएफओ सदस्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
ईपीएफओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या मुदतवाढीचा उद्देश कामगारांना सामाजिक सुरक्षा लाभ मिळत राहावेत हा आहे. अनेक तरुण नवीन रोजगार शोधल्यानंतर ईपीएफओमध्ये सामील होतात. पण दोन महिन्यांच्या बेरोजगारीनंतर निधी काढल्याने त्यांना पेन्शन आणि इतर लाभांच्या संधीपासून वंचित ठेवले गेले असते कारण पेन्शन लाभ एकूण 10 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा केल्यानंतरच उपलब्ध होतात.
आधीचा नियम
याआधी ईपीएफओने या कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता. याआधी एखादी व्यक्ती दोन महिन्यांपासून बेरोजगार असेल तर त्याला पीएफ आणि पेन्शन खात्यातून संपूर्ण रक्कम काढायची मुभा होती, पण आता हा नियम बदलण्यात आला आहे.
नवा नियम
ईपीएफओच्या नव्या नियमानुसार, आता एखादी व्यक्ती बेरोजगार झाली असेल आणि त्याला पीएफ अकाऊंटमधून संपूर्ण पैसे काढायचे असल्यास 12 महिने तर, पेन्शन खात्यातून पैसे काढण्यासाठी 36 महिने वाट पाहावी लागेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List