Ahilyanangar news – सर्वोच्च न्यायालयाकडून बाळ बोठेला जामीन
राज्यभर गाजलेल्या आणि राजकीयदृष्टय़ा संवेदनशील ठरलेल्या रेखा जरे हत्या प्रकरणात अखेर बाळासाहेब जगन्नाथ बोठे यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे.
न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि विपुल एम. पांचोळी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. रेखा जरे हत्येबाबत सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात बाळ बोठे याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले की, मुंबई उच्च न्यायालय, संभाजीनगर खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार जर खटला 31 ऑगस्ट 2024 पूर्वी संपला नाही, तर अपीलकर्त्यास जामिनाचा अधिकार राहील. तो आदेश आता अंतिम झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब करत बाळ बोठे याला जामीन मंजूर केला आहे.
उच्च न्यायालयाचा पूर्वीचा आदेश रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने अपील मंजूर केले. प्रलंबित अर्जही निकाली काढण्यात आले. या सुनावणीदरम्यान अपीलकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील सुधांशू चौधरी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना कैलास औताडे, नितीन भावर पाटील, शीतल पाटील, शिवकुमार जंगवड, सुनील सेठी यांनी सहकार्य केले. राज्य सरकारच्या वतीने भारत बागला, सिद्धार्थ धर्माधिकारी, आदित्य पांडे, श्रीरंग वर्मा आणि सागर पहुणे पाटील हे वकील उपस्थित होते.
पाच वर्षांपासून रेखा जरे हत्या प्रकरण न्यायालयीन स्तरावर प्रलंबित आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List