बोगस आधारकार्ड आणि मतदारांची घुसवाघुसवी उघड; रोहित पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आधारकार्ड काढले, फक्त 20 रुपयांत
हिंदुस्थानात जगातील कोणत्याही व्यक्तीचे आधारकार्ड काढता येऊ शकते. त्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही आणि पुराव्यांचीही गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व आमदार रोहित पवार यांनी आज चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधारकार्ड काढून दाखवले. तेसुद्धा फक्त 20 रुपये भरून. त्याचे प्रात्यक्षिकच त्यांनी माध्यमांसमोर दाखवून बोगस आधारकार्ड आणि मतदार याद्यांचे कनेक्शन उघड केले.
मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून पुराव्यानिशी उघड केल्यानंतरही निवडणूक आयोग कारवाईचे नाव घेत नाही. खोटे मतदार नोंदणीसाठी बोगस आधारकार्डांचा मोठय़ा प्रमाणात वापर झाला आहे. आज बॅलार्ड पिअर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा पुरावाच सादर केला.
जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे सांगत रोहित पवार यांनी एका संकेतस्थळावर ट्रम्प यांचे बोगस आधारकार्ड तयार करून दाखवले. एका संकेतस्थळावरून त्यांनी 123456789012 या क्रमांकाचे ट्रम्प यांचे आधारकार्ड काढले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प तात्या हे नाव, फेटा घातलेला ट्रम्प यांचा फोटो, घर क्रमांक – 007, गल्ली – पांढरा बंगला, गाव – राशीन, जन्मतारीख – 1-1-1951, लिंग – पुरुष आदी अशी माहिती या संकेतस्थळावर भरण्यात आली होती. त्यानंतर अर्ज फी ऑनलाईन 20 रुपये भरल्यानंतर ट्रम्प यांचे आधारकार्ड तयार झाले.
केवळ घरचा पत्ता बदलून तीनदा मतदार यादीत नावे आली. एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर दुसऱ्या ठिकाणी पुरुष म्हणून नोंदणी करण्यात आल्याचे पुरावेही रोहित पवार यांनी दाखवले.
उमेदवारांना हाताशी धरून देवांग दवेने केला घोटाळा
निवडणूक आयोगाची वेबसाईट हॅण्डल करण्याची जबाबदारी भाजपचे पदाधिकारी देवांग दवे यांच्याकडे दिली गेली. आमच्याआधी दवेकडे सगळी माहिती होती. काय घालायचे, डिलीट करायचे काम दवेने उमेदवारांना हाताशी धरून केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. निवडणूक आयोगाने मतदारवाढीचे विश्लेषण, पडताळणी केली असल्यास त्याची माहिती आणि वाढलेल्या मतदारांची माहिती लेखी स्वरुपात द्यावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List