महागाई आणि बेरोजगारी तरीही दिवाळीच्या उत्साहाला उधाण
महागाई, बेरोजगारी गगनाला भिडली असली तरी ‘दिवाळ सण आला मोठा, आनंदाला नाही तोटा’ या उक्तीप्रमाणे दिवाळीच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले आहे. बाजारांमध्ये नवीन कपडे, दागिने, चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या अक्षरशः उडय़ा पडत असून रस्त्यावरील खरेदीसाठी झुंबड उडत असल्याने दादरसारख्या बाजारपेठेत गर्दीमुळे चालणेही मुश्कील झाले आहे.
दिवाळी उत्सवावर महागाईचे सावट असून फराळासाठी लागणाऱया तेल, तूप, चणाडाळ, बेसन, साखर अशा सर्वच वस्तूंचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. तरीही या सणाच्या स्वागतात काही कमतरता राहू नये यासाठी प्रत्येक जण खिसा थोडा सैल सोडून खरेदी करीत आहे. दिवाळीनिमित्त लागणाऱया विविध वस्तूंनी गेल्या आठवडाभरापासून बाजारपेठा फुलल्या आहेत. दिवाळीनिमित्त मॉलमध्येही आकर्षक ऑफर मिळत असल्याने इथेही ग्राहकांची गर्दी होत आहे.
आज वसुबारसने शुभारंभ
दिवाळ सणाची सुरुवात उद्या 17 ऑक्टोबर रोजी बसुबारसने होणार आहे. गोमातेच्या पूजनाने घरात सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाणार आहे.
परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ
दिवाळीच्या निमित्ताने पारंपरिक दिवे, रांगोळ्या, पर्यावरणपूरक आकाश कंदील-दिव्यांनी बाजार फुलून गेले आहेत. याचबरोबर चायनीज तोरण, माळा, दिवे आणि आकर्षक आकाश कंदील बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे या दिवाळीत परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ दिसून येत आहे.
रेडिमेड, डाएट फराळाला पसंती
मुंबईमधील अनेक कुटुंबांमध्ये नवरा-बायको दोघेही नोकरी करीत असल्यामुळे अनेकांना घरी फराळ बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे रेडिमेड फराळाला मोठी मागणी असून अनेकांनी महिला बचत गटांना महिनाभर आधीच ऑर्डर दिली आहे. डाएट फराळ खरेदी करण्यावरही मुंबईकरांचा भर आहे. शिवाय घरगुती फराळ घरपोच घेण्याचा ट्रेंडही वाढला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List