ठाण्यात भाजपचा स्वबळाचा नारा
महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ठाण्यात भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. आज ठाण्यातील भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी थेट अब की बार.. 70 पारचा नारा दिला. वेळ पडली तर स्वतंत्र निवडणूक लढवू, अशी भूमिका घेत भाजपने शिंदे गटाला थेट आव्हानच दिले आहे.
ठाण्याचा महापौर हा आमचाच असेल असे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केले होते. त्यामुळे शिंदे गट व भाजपमध्ये वाकयुद्ध सुरू झाले. आज वर्तकनगर येथील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची कार्यशाळा भाजपने आयोजित केली होती. या कार्यशाळेत 416 जणांनी भाग घेतला. केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, संदीप लेले हेदेखील यावेळी उपस्थित होते.
मागील निवडणुकीत ठाण्यात भाजपचे 23 नगरसेवक निवडून आले. यंदा आम्ही जोरदार तयारी केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही भाजपचे पारडे जड आहे, असे ठाणे शहर भाजप अध्यक्ष संदीप लेले म्हणाले.
…तर सर्व जागा लढू
भाजपच्या नेत्यांची भाषणे सुरू असतानाच कार्यकर्त्यांमधून स्वबळावर लढू… अब की बार… 70 पार अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यशाळेनंतर संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमचे सैन्य 365 दिवस तयार आहे. प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही यापूर्वीच महापौर आमचा होईल, असे सांगितले आहे आणि वेळ आलीच तर भाजप सर्व ठिकाणी लढेल, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List