धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी! कळंब, निलंगा तालुक्यात हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला, एकाचा मृत्यू

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी! कळंब, निलंगा तालुक्यात हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला, एकाचा मृत्यू

मराठवाड्यात यंदा परतीचा पाऊस पुन्हा परतला असून, आज धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत धो-धो पाऊस कोसळला. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील चार मंडळांत शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: हाहाकार उडाला. अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, एक जण पुरात वाहून गेला आहे. या अतिवृष्टीने शेतकर्‍यांनी काढलेल्या सोयाबीनचा चिखल झाला असून, बळीराजा पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे. लातुरातील निलंगा तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे कळंब तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन शेतकर्‍यांना धीर देत आहेत.

मागील दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाईघाईत सोयाबीनची काढणी सुरू केली होती. त्यातच शनिवारी मध्यरात्री पाऊस जोरदार बरसला आहे. त्याचा फटका धाराशिवमधील कळंब तालुक्याला बसला. तालुक्यातील बाभळगाव, देवळाली, भाटशिरपुरा, जवळा खु. एकुरका आदी गावांतील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य निकामी झाले. घरात पाणी साचल्याने अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे.

वाहतूक ठप्प

अंदोरा-बाभळगाव, देवधानोरा-एकुरका रोड, वाशिरा नदीवरील इटकूर-पारा रस्ता, इटकूर भोगजी रस्ता, मोहा – कळंब, कोठाळवाडी रस्ता आणि खामसवाडी-मोहा- कन्हेरवाडी मार्गावर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागरिकांना आता लांबच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. तर संजीतपूर गावाला पुराचे पाणी धडकले आहे. खामसवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

भरडलेल्या सोयाबीनच्या घुगर्‍या…

इटकूर येथील वाशिरा नदीला आलेल्या महापुराने अक्षरश: थैमान घातले. बापूराव गंभीरे यांनी भरडलेल्या सोयाबीनच्या अक्षरश: घुगर्‍या झाल्या. वाळत घातलेले भिजलेले सोयाबीन ओंजळीने भरताना मन हेलावून जात होते. इटकूर येथील विश्वनाथ आडसुळ यांचे काढलेल्या सोयाबीनची गंजी वाशिरा नदीच्या पुरात वाहून गेली. नदीकाठच्या सोयाबीनचा चिखल झाला. शेतांमध्ये तळे साचले.

नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणार्‍या पावसामुळे मांजरा धरणाच्या सांडव्याची ६ वक्रद्वारे २.२५ मीटरने उचलून विसर्ग सुरू असून, मांजरा नदीपात्रात ३९ हजार ९१४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चार मंडळात अतिवृष्टी

कळंब ४६ मिमी, इटकूर ७२ मिमी, येरमाळा ४८मिमी, मोहा ७४.३, शिराढोण ७७, गोविंदपूर ७७ मि. मी पाऊस झाला आहे. सहा मंडळापैकी चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे. एकुरका येथील जवळा-एकुरका नदीच्या पात्रावरील दोन्ही कोल्हापुरी बंधारे वाहून गेले आहेत. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

एक जण पुरात वाहून गेला

रविवारी सकाळी सहा वाजता पाडोळी येथील शेतकरी विजयकुमार सत्यनारायण जोशी (४३) हे दूध आणण्यासाठी आणि जनावरांना चारा देण्यासाठी शेतात गेले होते. शेतातून घरी परतताना निपाणी-पाडोळी ओढ्यातील पाण्याची पातळी खूप वाढली होती. बंधार्‍यावरून पाणी वेगात वाहत असल्यामुळे अंदाज चुकल्यामुळे ते वाहून गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

खासदार राजेनिंबाळकर यांची भेट

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कळंब तालुक्यातील ढोराळा, पाडोळी, वाठवडा, देवळाली, जवळा (खुर्द) व एकुरका येथे पाहणी केली. या गावांतीलपरिस्थिती पाहता राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फराळ पोटभर खा, गॅसची समस्या असेल तर ‘हे’ 5 घरगुती उपाय जाणून घ्या फराळ पोटभर खा, गॅसची समस्या असेल तर ‘हे’ 5 घरगुती उपाय जाणून घ्या
काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही केवळ अ‍ॅसिडिटी आणि गॅसपासून आराम मिळवू शकत नाही तर पचनक्रिया देखील सुधारू शकता....
डोनेस्क द्या, विषय संपवून टाका! युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांची ट्रम्पना अट
कतारची मध्यस्थी, अफगाणिस्तान- पाकिस्तान युद्धबंदी
खळबळजनक! आईच्या शोधात घराबाहेर पडलेल्या चिमुकलीचा मोकाट कुत्र्यांनी घेतला बळी
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले दिल्लीच्या जुन्या मिठाईच्या दुकानात, व्हिडीओ शेअर करत अनुभव लिहीला
Photo – नेत्रदिपक रोषणाईने शिवसेना भवन झळाळले
चेहऱ्यावर मध लावण्याचे काय फायदे होतात, जाणून घ्या